कथा सालारजंग वस्तूसंग्रहालयातील ‘दुहेरी पुतळ्या’ची


हैदराबाद येथील प्रसिद्ध सालारजंग वस्तूसंग्रहालयाच्या भव्य वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावरील एका कक्षामध्ये, या वस्तूसंग्रहालयाची खासियत असलेला आणि अतिशय प्रसिद्ध असलेला ‘दुहेरी पुतळा’, शिसवीच्या सुंदर मंचकावर मोठ्या डौलाने उभा आहे. चेहऱ्यावर अतिशय कुत्सित हसू असलेला, डोक्यावर ‘क्लोक’ पांघरलेल्या पुरुषाचा ‘लाईफ साईझ’ पुतळा आपल्याला पहावयास मिळतो. या पुतळ्यामागे असलेल्या भव्य आराश्यामध्ये मात्र, पुरुषाच्या पुतळ्यामागे, नजर झुकविलेल्या, हाती प्रार्थनेचे पुस्तक असलेल्या करूणमूर्ती स्त्रीचा पुतळा आपल्याला पहावयास मिळतो. अश्या प्रकारे पुढून पाहिल्यास पुरुष आणि मागच्या बाजूने पाहिल्यास स्त्री दृष्टीस पडणारा असा ‘दुहेरी पुतळा’ सायकामोर नामक वृक्षाच्या लाकडापासून तयार करण्यात आला असून, सालारजंग वस्तूसंग्रहालयातील सर्वात प्रसिद्ध वस्तूंमध्ये या पुतळ्याची गणना केली जाते. केवळ या पुतळ्याची शिल्पकारी याची खासियत नसून, या पुतळ्याशी निगडित कथेमुळे या पुतळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

‘मेफीस्टोफीलिस अँड मार्गारिटा’ असे नाव असेलल्या, स्त्री आणि पुरुष यांच्या या दुहेरी पुतळ्याची कल्पना एकोणिसाव्या शतकातील जर्मन नाटककार योहान वोल्फगांग फॉन गोएथ यांच्या प्रसिद्ध ‘फाउस्ट’ या नाटकातील दोन पात्रांवर आधारित आहे. या नाटकाचा एक भाग १८०८ साली तर दुसरा भाग १८३२ साली लिहिला गेला. हे नाटक युरोप आणि अमेरिकेमध्ये अतिशय गाजले. या नाटकाचे कथानक ‘फाउस्ट’ नामक एका अतिशय यशस्वी, पण सदैव असमाधानी असलेल्या मनुष्याच्या आयुष्यावर आधारित आहे. नाटकाच्या पहिल्या भागामध्ये मेफीस्टोफीलिस नामक सैतानाचा दूत फाउस्टला सर्व ऐहिक सुखे देऊ करून त्या बदल्यात त्याचा आत्मा मागून घेतो. सर्व ऐहिक सुखांचे वरदान लाभलेला फाउस्ट, मार्गारिटा नामक एका मुलीच्या प्रेमात पडतो. मार्गारिटाला देखील फाउस्टबद्दल आकर्षण वाटू लागते आणि दोघे एकमेकांच्या अतिशय जवळ येतात. त्यांच्या प्रेमसंबंधातून मार्गारिटाला कन्यारत्न प्राप्त होते, पण मार्गारिटा अविवाहित असल्याने, समाजाची निंदा सहन करावी लागेल या भीतीने ती आपल्या नवजात कन्येला जलसमाधी देऊन टाकते. तिच्या या अपराधाबद्दल तिला देहांताची शिक्षा होते. तिला शिक्षेपासून वाचविण्याचे फाउस्टचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरतात. नाटकाच्या दुसऱ्या भागातील कथानकामध्ये आयुष्यभर चांगली कर्मे केल्याने फाउस्टला मृत्युच्या पश्चात स्वर्गप्राप्ती होत असून, तिथे त्याची मार्गारिटाशी पुनर्भेट झाल्याचे वर्णन आहे. याच कथानकावर आधारित, फाउस्टला ऐहिक सुखे देण्याच्या बदल्यामध्ये त्याचा आत्मा मागून घेणारा सैतानाचा दूत आणि पश्चात्तापाच्या अग्नीत जळत असलेली मार्गारिटा असा हा दुहेरी पुतळा आहे.

१८७०चे दशक हा युरोपियन संस्कृतीच्या भरभराटीचा, वैभवाचा काळ होता. याच काळाच्या दरम्यान एका अज्ञात फ्रेंच शिल्पकाराने हा दुहेरी पुतळा घडविला. १८७६ साली हैदराबादच्या निझामांचे तत्कालीन पंतप्रधान नवाब मीर तुराब अली युरोपमध्ये असताना त्यांनी हा पुतळा पाहिला आणि हा पुतळा पाहून ते जणू भारावून गेले. त्यांनी हा पुतळा फ्रांसहून भारतामध्ये आणविला. सालारजंग वस्तूसंग्रहालयामध्ये आणविलेल्या पहिल्या वहिल्या वस्तूंमध्ये या पुतळ्याचाही समावेश होता. याच वेळी मीर तुराब अली यांनी ‘द व्हेल्ड रिबेका’ हा आणखी एक अतिशय सुंदर पुतळा रोममध्ये खरेदी करून सालारजंग वस्तूसंग्रहालयामध्ये आणविला. आजच्या काळामध्येही, दुहेरी पुतळ्यासोबतच संगमरवरी ‘व्हेल्ड रिबेका’ हा पुतळा देखील वस्तूसंग्रहालयाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.

Leave a Comment