‘ऑईल पुलिंग’ म्हणजे नेमके काय, आणि काय आहेत याचे फायदे ?


एखाद्याने स्मितहास्य केल्यानंतर त्या व्यक्तीचे चमकणारे, निरोगी दात, त्या स्मितहास्याचे सौंदर्य कितीतरी खुलवीत असतात. दातांची आणि हिरड्यांची उत्तम काळजी घेतल्याने दात आणि हिरड्या निरोगी राहतात. त्यामुळे दातांमध्ये कीड उद्भविणे, हिरड्या सुजणे, त्यांमध्ये जीवाणूंचे संक्रमण होणे, दात पिवळे पडणे, इत्यादी समस्या उद्भविण्याची शक्यता पुष्कळ अंशी कमी होते. दात आणि हिरड्या निरोगी आणि बळकट ठेवण्यासाठी ‘ऑईल पुलिंग’चा सल्ला देण्यात येत असतो. यामध्ये तोंडामध्ये थोडे तेल घेऊन ते तोंडामध्ये व्यवस्थित खुळखुळवत फिरवायचे असते.

या पद्धतीचा अवलंब केल्याने तोंडातील जीवाणू आणि इतर घातक तत्वांचा नाश होऊन दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते. ‘ऑईल पुलिंग’ची पद्धत सध्या लोकप्रिय होत असली, तरी ही पद्धत नवी नाही, तर प्राचीन असून, सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. १९९०च्या दशकामध्ये रशियन वैद्यकीय तज्ञ डॉक्टर कराख यांनी ‘ऑईल पुलिंग’ चे मौखिक आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्व पटवून दिल्याने ही पद्धत पुन्हा वापरात आली आहे. आयुर्वेदाच्या अनुसार नियमित केले जाणारे ‘ऑईल पुलिंग’, तीस निरनिराळ्या आजारांवरवर गुणकारी ठरू शकते. यातील काही आजार मौखिक आरोग्याशी संबंधितही नाहीत, तरीही ऑईल पुलिंगचा फायदा या आजारांवर होऊ शकतो.

ऑईल पुलिंगमध्ये तोंडामध्ये एका चमचा खोबरेल किंवा तिळाचे तेल घेऊन हे तेल सुमारे पाच ते सात मिनिटे, तोंडामध्ये पाण्याची चूळ भरताना ज्याप्रमाणे पाणी तोंडामध्ये खुळखुळवले जाते, त्याचप्रमाणे खुळखुळवायचे असते. त्यानंतर ही तेल थुंकून टाकले जाते. आयुर्वेदाच्या अनुसार ऑईल पुलिंगसाठी कुठल्या व्यक्तीने कुठले तेल वापरावे हे त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. नियमित ऑईल पुलिंग केल्याने काहीच दिवसांत दातांवर गोळा झालेले ‘प्लाक’ कमी होऊ लागते, हिरड्या अधिक बळकट बनतात, आणि दातांना कीड लागण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. ऑईल पुलिंग केल्याने तोंडातील सर्व विषारी घटकांचाही नाश होतो. ऑईल पुलिंगची पद्धत ‘जिंजीव्हायटीस’ नामक हिरड्यांच्या रोगामध्ये विशेष उपयुक्त आहे. या रोगासाठी ऑईल पुलिंगचा अवलंब करायचा झाल्यास खोबरेल तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करण्यात येतो.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तिळाच्या किंवा सूर्यफुलाच्या तेलाने ऑईल पुलिंग करणे उत्तम ठरते. यामुळे दातांवरील पिवळेपणा कमी होऊन दातांमधली इतर घाण, आणि दातांवरील डागही नाहीसे होतात. आहारामध्ये साखरयुक्त पदार्थ आणि प्रोसेस्ड पदार्थ जास्त असण्यासोबतच जर दातांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसेल तर दात किडण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर तोंडामधून येणाऱ्या दुर्गंधीचीही समस्या असतेच. आहारावर नियंत्रण ठेऊन त्यातील साखरयुक्त पदार्थ कमी केल्याने आणि खोबरेल तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करून नियमित ऑईल पुलिंग केल्याने मौखिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment