महिलांनी गर्भावस्थेत व्यायाम करताना अशी घ्यावी काळजी


जेव्हा एखादी महिलेला आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना समजते, तेव्हा तिने काय खावे, काय खाऊ नये, कोणते कपडे घालावेत, किती वेळ काम करावे, कितीवेळ आराम करावा, कसे उठावे, कसे बसावे, या आणि अश्या अनेक बाबतीत सल्ल्यांचा भडीमारच जणू तिच्यावर होत असतो. सर्वजण आपापल्या परीने त्या महिलेला चांगलेच सल्ले देत असले, तरी यातील कोणते सल्ले स्वीकारावेत आणि कोणते नाही, या बद्दल विचार करून मात्र त्या महिलेच्या मनामध्ये चांगलाच गोंधळ उडत असतो. गर्भावास्थेमध्ये महिला जितकी सक्रीय राहील, तितके तिचे बाळंतपण सोपे होत असते, हा सल्ला देखील गर्भवती महिलेला नेहमीच दिला जात असतो. पूर्वीच्या काळी महिला घरातील कामे करत असतानाच त्यांना भरपूर शारीरिक व्यायाम आपोआपच मिळत असे. आता काळ बदलला तसे घरातील अधिकतर कामे करण्यासाठी मशीन्सचा वापर केला जाऊ लागला. लोकांचे राहणीमान सुधारल्याने घरातील कामांसाठी कामवाल्या मावशींची मदतही सहज उपलब्ध झाली. त्यामुळे गर्भावस्थेत सक्रीय राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहेच, पण त्यासोबत कोणत्या प्रकारचे व्यायाम केले जावेत जेणेकरून महिलेला आणि तिच्या बाळाला यापासून कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही, याचा विचार केला जाणे हे महत्वाचे आहे.

आपण आई होणार असल्याची बातमी ही एखाद्या महिलेच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीतही मोठा बदल घडविणारी असते. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या बारा आठवड्यांच्या काळामध्ये शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल घडून येत असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये सतत थकवा, होणाऱ्या बाळाविषयी, प्रसुतीविषयीची चिंता महिलेला सतावू शकते. त्यानंतरच्या दिवसांमध्ये मात्र हार्मोन्सच्या पातळी स्थिरस्थावर झाल्याने ही सर्व लक्षणे नाहीशी होऊन, गर्भार महिलेच्या चेहऱ्यावर आगळेच तेज दिसू लागतो. या दिवसांत मनामध्ये अतिशय उत्साह आणि आनंद भरलेला असतो. या दिवसांमध्ये आरोग्य उत्तम राखण्यासाठी एरव्ही आवर्जून केला जाणारा व्यायाम थोडास मागे पडू शकतो, तेव्हा व्यायाम करायलाच पाहिजे असा अट्टाहास न करता, आपल्याला मानवेल आणि झेपेल तेवढाच व्यायाम घेणे श्रेयस्कर ठरते. व्यायामाच्या बाबतीत, गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये काळजी घेतले जाणे अतिशय आवश्यक असते. या दिवसांमध्ये अवाजवी श्रम घडविणारे व्यायाम टाळून हलके व्यायाम घेणे चांगले. यामध्ये चालण्याचा व्यायम सर्वात उत्तम समजला जातो.

गर्भावस्थेचे तीन महिने पार पडले, की त्यानंतर आपल्याला झेपेल तेवढे चालण्याचे अंतर आणि गती कमीजास्त करावी. या दिवसांमध्ये पोटाचा आकार वाढण्यास सुरुवात होत असल्याने महिलेच्या शरीराची ‘सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी’, संतुलन या सर्वच गोष्टींमध्ये बदल होत असतो. हे बदल ध्यानी घेऊनच व्यायामाचा विचार केले जाणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये सायकल चालविणे, पळणे यांसारखे व्यायाम शक्यतो टाळावेत. तसेच फार जड वस्तू उचलणे, सतत जिन्यांची चढ-उतार इत्यादी ही टाळायला हवे. गर्भावास्थेमध्ये कोणताही नवा व्यायामप्रकार सुरु करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आपल्या शरीराच्या सवयीचा आणि सहज झेपेल अश्याच व्यायामप्रकारची निवड केली जाणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये श्वास रोखून धरणे आवश्यक असतील असे, किंवा ‘क्रन्चेस’, ‘प्लँक’ सारखे व्यायामप्रकारही आवर्जून टाळायला हवेत.

गर्भावास्थेमध्ये सौना किंवा स्टीम रूम्सचा वापर आवर्जून टाळावा. या दिवसांमध्ये सौना किंवा स्टीम रूम्सचे वाढते तापमान पोटातील बाळाच्या दृष्टीने घातक ठरू शकते. किंबहुना या दिवसांमध्ये जास्त तापमान असलेल्या ठिकाणी जाणे टाळून शरीरामध्ये पाण्याची मात्रा योग्य राहील याची काळजी घेत, शरीराचे तापमान सामान्य राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment