अशी आहे कुळकथा मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘सरदार पावभाजी’ची


गेली त्रेपन्न वर्षे हे रेस्टॉरंट अव्याहत सुरु आहे. इतर रेस्टॉरंट्स पेक्षा काहीसे वेगळे, कारण या ठिकाणी केवळ सहा निरनिराळ्या प्रकारे बनविली जाणारी चविष्ट पावभाजी, इतर थोडे फार पदार्थ, ज्या ऋतुंमध्ये जी ताजी फळे उपलब्ध असतील ते मिल्कशेक्स आणि शीतपेये इतके पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. जसेजसे आपण या रेस्टॉरंटच्या जवळ पोहोचू, तसतसा लोखंडी तव्यावर पावभाजी बनविताना त्यावर डाव आपटला गेल्याने होणारा आवाज आपल्या कानी पडू लागतो. त्याचबरोबर पहावयास मिळते ग्राहकांची लांबलचक रांग आणि नाकाशी दरवळू लागतो पावभाजीचा, एक क्षणात तोंडाला पाणी सुटेल असा चविष्ट वास.. अश्या प्रकारे प्रत्येक ग्राहकाच्या सेवेत दक्षिण मुंबईच्या ताडदेव भागामध्ये असलेले ‘सरदार पावभाजी’ हे रेस्टॉरंट, गेली अनेक वर्षे उभे आहे. पावभाजी हा पदार्थ मुळात अस्तित्वात आला कसा यामागे ही मोठा रोचक इतिहास आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या काळामध्ये भारतातील सुती कपड्याला परदेशांतून मोठी मागणी असल्याने मुंबईतील कापड गिरण्यांचा व्यवसाय जोमात होता. परदेशातून सातत्याने वाढत जाणारी सुती कपड्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कापड गिरण्यांतील कामगार दिवसरात्र मेहनत करीत होते. पाहता पाहता त्यांच्या कामाचा व्याप इतका वाढला, की कामगारांना घासभर जेवण्यासही वेळ पुरेनासा झाला. कामगारांना उपाशीपोटी काम करू देणे अशक्य होते. त्यामुळे झटपट मोठ्या प्रमाणात तयार होणारा आणि पोटभरीचा असा काहीतरी पदार्थ त्यांच्यासाठी तयार करण्याची आवश्यकता भासू लागली.

त्यातूनच जन्म झाला पावभाजी या पदार्थाचा. सर्व भाज्या शिजवून, एकत्र ‘मॅश’ करून आणि काही मसाले वापरून तयार केलेली भाजी आणि त्यासोबत पाव अशी ही पावभाजी, कापड गिरण्यांच्या बाहेर असलेल्या ठेल्यांवर, लहान लहान दुकानांमध्ये तयार केली जाऊ लागली. आणि काही काळातच हा पदार्थ केवळ गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्येच नाही, तर सामान्य नागरिकांमध्येही लोकप्रिय होऊ लागला. आता तर हा पदार्थ देशभरातच काय, तर जगभरातच अतिशय हौशीने बनविला जातो आणि तितक्याच चवीने खाल्ला ही जातो.

मुंबईतील सरदार पावभाजी या रेस्टॉरंटमध्ये हर तऱ्हेचे ग्राहक पहावयास मिळतात. अगदी कॉलेजमधील तरुणाई पासून नोकरदार मंडळी, परिवारासह पावभाजी चाखण्यासाठी आलेली मंडळी, इतकेच काय तर अगदी बॉलीवूड सेलिब्रिटीज देखील इथल्या पावभाजीचा आस्वाद घेत असतात. आजही ग्राहकांच्या सेवेमध्ये अव्याहत व्यस्त असलेले हे रेस्टॉरंट आता त्रेपन्न वर्षांचे झाले आहे. या रेस्टॉरंटचे मूळ मालक सरदार अहमद यांनी सुरुवातीला ताडदेव मधील कापड गिरणीतील कामगारांसाठी खाद्यपदार्थ विकण्यापासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. पण कामगारांसाठी काहीतरी पोटभरीचे, ताजे आणि पौष्टिक भोजन उपलब्ध व्हायला हवे या इच्छेतून त्यांनी पावभाजी बनवून विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला केवळ ताडदेवच्या कापड गिरणीबाहेर चालणारा हा त्यांचा व्यवसाय १९६६ साली सरदार पावभाजी रेस्टॉरंटच्या रूपात सुरु झाला, आणि आता इतक्या वर्षांनंतर चांगलाच नावारूपाला आला आहे.

काळ बदलला तसे सरदार पावभाजी रेस्टॉरंटच्या बाबतीतही काही बदल घडून आले. एके काळी साठ पैशांत मिळणारी पावभाजी आता १४० ते दोनशे रुपयांमध्ये मिळू लागली आहे. पण तरीही एक गोष्ट आज इतक्या वर्षांच्या नंतरही कायम आहे, ती म्हणजे या पावभाजीची तीच रुचकर चव आणि वाढत जाणारी लोकप्रियता. आताच्या काळामध्ये या रेस्टॉरंटमध्ये चीज पावभाजी पासून विना कांदा-लसूण बनविली जाणारी जैन पावभाजी, खडा पावभाजी असे पावभाजीचे अनेक प्रकार उपलब्ध असून हे येथील खास लोकप्रिय प्रकार आहेत. त्या व्यतिरिक्त येथील कॅरमेल कस्टर्ड आणि चॉकोलेट मूस हे पदार्थही विशेष लोकप्रिय आहेत.

Leave a Comment