मध्य प्रदेशच्या शिक्षण बोर्डाने इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात केली घट


भोपाळ – शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम मध्य प्रदेश बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (एमपीबीएसई) ने कमी केला आहे. या वर्षी देखील सुरू असलेल्या कोरोना लॉकडाउनमुळे शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एमपीबीएसईने हे लक्षात घेऊन इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञानाबरोबरच मानव्यविद्या, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीबीएसईच्या mpbse.nic.in. या वेबसाईटवर सर्व इयत्ता आणि शाखांसाठी हटवण्यात आलेल्या विषयांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान आसाममध्ये माध्यमिक शिक्षण बोर्डाने (एसईबीए) इयत्ता नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात देखील घट केलेली आहे. काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) आयसीएसई(इयत्ता दहावी) आणि आयसीएसी (इयत्ता बारावी) परीक्षांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. विद्यार्थ्यांना कोरोना संकट काळात येत असलेल्या अडचणी पाहता अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

या अगोदर देखील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण पारदर्शी आणि पेपरलेस बनवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदाच एक ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली आहे. जिओ टॅग तंत्रज्ञानावर आधारित मध्य प्रदेशची ही ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली असेल आणि सध्या चालू शैक्षणिक वर्षादरम्यान तीन कोटी ५५ लाख पुस्तकांचे वितरण करण्याचा प्रयत्न करेल. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) सहकार्याने ऑनलाइन जिओ-टॅगिंग प्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली पाठ्यपुस्तक महामंडळाकडून पुस्तके ट्रॅक करण्याचा प्रयत्न करते. शालेय विद्यार्थ्यांना जिथे वितरित करण्यासाठी ते मुद्रित केले जातात.