२०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबई – पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. पुणे आणि पिंपरी- चिंचवड या शहरातील विविध विकासकामाचा सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री शिंदे यांनी या दोन्ही महापालिका आयुक्तांना दिले.

३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या नियमांची अंमलबजावणी अजूनही सुरु झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने, याबाबत शासनाने सर्व मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले होते. त्यानुसार आलेल्या प्रस्तावावर नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करावी, तसेच कोणत्याही गुंठेवारीधारकास गुंठेवारी नियमित करण्याची इच्छा असल्यास त्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे. यानंतर पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून भरतीसाठी पदांच्या आकृतिबंधाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांना दिले.

पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत योजना अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचे समजले. शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी या योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना दिले.तसेच ही योजना पूर्ण होईपर्यंत देखील शहरातील नागरिकांना एक दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.