ईडीने एकनाथ खडसे यांच्याविरोधात दाखल केले एक हजार पानी आरोपपत्र


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही या एक हजार पानी आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. मनी लॉड्रींगचा आरोप या सर्वांवर लावण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही फेटाळून लावला.

या प्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवला गेल्याचा आरोप गिरीश चौधरी यांनी केला होता. मात्र विशेष पीएमएलए न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

एकनाथ खडसे हे 2016 मध्ये महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. पण खडसे यांना एसीबीने याप्रकरणी क्लीन चीट दिली होती.