राज्य सहकारी बँकेवर ईडीच्या छापेमारीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण


पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्य सहकारी बँकेशी संबधित एकूण 7 ठिकाणी धाडी टाकल्या असल्याचे वृत्त समोर आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ईडीची राज्य सहकारी बँकेवर छापेमारी किंवा चौकशी झालेली नसल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. या संदर्भात खोटे वृत्त दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पवार यावेळी म्हणाले की, प्रसार माध्यमांकडे राजू शेट्टी यांचा पत्ता कट, हेमंत टकले यांना संधी या बातम्या कुठून येतात हेच कळत नाही. विश्वासार्ह बातम्या प्रसार माध्यमांनी द्याव्यात, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार मंदिरे खुली करण्यासंदर्भात बोलताना म्हणाले की, मंदिरे खुली करा, हा भावनिक मुद्दा आहे. यावर काही पक्ष आणि काही जण आंदोलन करून राजकीय इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत पवार म्हणाले की, इतर राज्यांनी शाळा सुरू केल्या असल्या, तरी आम्ही टास्क फोर्सला विचारून निर्णय घेणार आहोत. दिवाळी पूर्वी सुरू कराव्यात किंवा नंतर असे 2 मतप्रवाह आहेत, पण मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होत आहे. त्याचा फटका माझ्या सारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात आहे. मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी असल्याचेही अजित पवार म्हणाले.