चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – विजय वडेट्टीवार


मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज मोकासा, चेक बरांज, सोमनाला, बोन्थाला, कढोली, केसुर्ली आणि चिंचोर्डी या गावांमध्ये कोळसा खाणीसाठी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड ने जमिनीचे भूसंपादन केले आहे.या गावातील प्रकल्पग्रस्तांना कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये २०१६ मध्ये झालेल्या करारानुसार कार्यवाही करावी, तसेच प्रकल्पबाधित कुटूंबाचे जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण करून फेरअहवाल शासनाकडे सादर करावा या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही मदत व पनुर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्येबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिम गुप्ता, दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे, नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (केपीसीएलचे) व्यवस्थापकीय संचालक व्ही.होनराज, स्वागत उपाध्याय, बरांज ग्राम काँग्रेस कमिटी प्रकल्पग्रस्त विशाल दुधे, नितीन चालखुरे उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, प्रकल्पबाधित गावातील कुटूंबाचे जिल्हाधिकारी यांनी फेर सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे सादर करावा. प्रकल्पबाधितांची यादी करताना सर्व पडताळणी केली जावी. केपीसीएलने कामगारांचा २०१५ पासून ते २०२० पर्यंतचा उर्वरीत पगार त्वरीत द्यावा. पुनर्वसन करारातील न्यूनतम वेतन कायदा १९४८ बाबत कामगार आयुक्तांसोबत चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. कुटूंबसंख्या निश्चित झाल्यानंतर त्याची प्रसिद्धी करण्यात यावी. जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर कराराप्रमाणे कंपनीने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.