नसीरुद्दीन शाह यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना झापले


तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तेथील परिस्थिती ही बिकट झाली आहे. तालिबान महिला आणि मुलांना याचा सगळ्यात जास्त त्रास होत आहे. अफगाणिस्तानमधून पळून जाण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. तालिबानी लोकांवर जगभरातून टीका होत आहे. पण, काही भारतीय तालिबानी राजवटीचे कौतुक करत आहेत. आता बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यावर टीका केली आहे. तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर नसीरुद्दीन यांनी निशाणा साधला आहे.


‘द महाराष्ट्रा न्यूज’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. भारतीय इस्लाम आणि जगातील इतर इस्लाममधील फरक या व्हिडीओत त्यांनी सांगितला आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा ताबा मिळवणे ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवल्यामुळे काही भारतीय मुस्लीम आनंदी होत आहेत, हे सगळ्यात जास्त धोकादायक असल्याचे नसीरुद्दीन म्हणाले.

पुढे ते म्हणाले, जगभरातील इस्लामपेक्षा भारतीय इस्लाम हा नेहमीच वेगळा राहिला आहे आणि देवाने ती वेळ आणायला नको पाहिजे, जिथे ते खूप बदलतील आणि आपण त्याला ओळखूही शकणार नाही. भारतीय मुस्लिमांनी आज स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की इस्लामला सुधारणा आणि आधुनिकतेची गरज आहे की जुन्या काळात सुरु असलेली क्रुरतेची? मी हिंदुस्तानी मुस्लीम आहे आणि मिर्झा गालिब यांनी खूप आधी म्हटल्याप्रमाणे, माझा देवाशी संबंध हा अनौपचारिक आहे. मला राजकीय धर्माची गरज नाही.