‘न्हावा-शेवा योजना टप्पा २’ जलदगतीने राबविण्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश


मुंबई : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पाणी पुरवठ्याच्या विविध नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र असे असले तरी जुन्या योजना प्रभावीपणे सुरु ठेवण्यात याव्यात. न्हावा-शेवा योजना टप्पा 2 जलदगतीने राबविण्यात यावी अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रस्तावित व प्रगतीपथावरील योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या पाणी पुरवठा केंद्रासंदर्भात आढावा बैठक पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चालू असलेल्या पाणी पुरवठा केंद्राकडून जास्तीत जास्त लोकांना पाणीपुरवठा होईल असे नियोजन करावे
बनसोडे म्हणाले की, नवी मुंबई, पनवेल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शहरीकरणात वाढ होत आहे. या भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित होणे आवश्यक असून नवीन पाणी पुरवठा योजना जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. सध्या कार्यान्वित असलेल्या जुन्या पाणी पुरवठा योजना जास्तीत जास्त क्षमतेने सुरु ठेवाव्यात जेणेकरुन नागरिकांना पाणी पुरवठा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

वाढीव न्हावा – शेवा पाणी पुरवठा योजना, माथेरान सुधार व वाढीव पाणी पुरवठा योजना, वाढीव न्हावा-शेवा पाणी पुरवठा योजना टप्पा 3 योजनांबाबतचा आढावा यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी घेतला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलव्यवस्थापन केंद्रे जास्तीत जास्त क्षमतेने चालवून शक्य तितक्या ग्राहकांना पाणी पुरवठा करावा जेणेकरुन नागरिकांनाही सुविधा उपलब्ध व्हावी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या महसुलातही वाढ व्हावी, असेही बनसोडे यांनी सांगितले.