बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; धनंजय मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना


बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे. तसेच काही तालुक्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 24 तास सतर्क राहून आवश्यक तिथे मदत कार्य करावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

अनेक ठिकाणी खरीप पिकांचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पावसाने उघडीप देताच विमा कंपनी, महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. काही गावांचा संपर्क तुटल्याचेदेखील वृत्त येत आहे, त्यामुळे आधी नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, कुठेही जीवित किंवा वित्त हानी होणार नाही या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दिले आहेत.

पावसाचा तडाखा पूर्णपणे कमी होईपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, धोक्याचे ठिकाण, जलाशय, वाहत्या नद्या अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुंडे यांनी जिल्हावासियांना केले आहे.

अंबाजोगाईच्या ‘त्या‘ घटनेची तातडीने चौकशी करा – धनंजय मुंडे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश
अंबाजोगाई येथे दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाली असून काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, या प्रकरणी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक आर.राजा यांना दूरध्वनीवरून संपर्क करून अंबाजोगाईच्या या घटनास्थळी भेट देऊन स्वतः तातडीने चौकशी करावी व आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच कोणत्याच परिस्थितीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.