ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू हिंदुजा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून रक्तदाबासंबंधी काही समस्या जाणवत असल्यामुळे दिवगंत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सायरा बानू यांना खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मागील तीन दिवसांपासून रक्तदाबासंबंधी समस्या जाणवू लागल्या होत्या. त्यांना आता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. सायरा बानू लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

सायरा बानू यांचे पती दिलीप कुमार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची सायरा बानू या काळजी घेत होत्या. दिलीप कुमार रुग्णालयात असताना सायरा बानू त्यांच्या प्रकृती विषयी माहिती देत होत्या. त्यांच्या लग्नाला ५४ वर्षे झाली होती. आता सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहेत.