‘देऊळबंद’ असताना व्हिआयपी दर्शनावरुन मनसेने साधला मुख्यमंत्री आणि आदेश बांदेकरांवर निशाणा


मुंबई – भाजपने ३० ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरातील मंदिरांपुढे कोरोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी शंखनाद आंदोलन केले. सध्या राज्यातील मंदिरांना कोरोनामुळे टाळ लागले आहे. एकीकडे राज्यातील मंदिरे उघडण्यावरून घमासान सुरु आहे. दुसरीकडे हा मुद्दा वारंवार विरोधी पक्षाकडून उचलूनही धरला गेला आहे. हळूहळू राज्य अनलॉक करत असताना देखील मंदिरांना लागलेली कुलुपे मात्र उघडली गेली नाहीत.

राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर आता मनसेने यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबई पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोना निर्बंधांच्या आड सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध जपणारी आणि सर्वसामान्यांच्या त्रासात विनाकारण भर घालणारी दुटप्पी धोरणे सरकार आखत असल्याची टीका केली होती. तसेच सर्व मंदिरे उघडली गेलीच पाहिजेत. अन्यथा, मंदिरांबाहेर आम्ही घंटानाद करू, असे देखील म्हटले होते.

दुसरीकडे या प्रकरणावरुन मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनीही टीका केली आहे. घंटानाद करा किंवा आणखी कुठला नाद करा, पण आमचा नाद करू नका, असे म्हणणाऱ्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांचे दात त्यांच्याच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पराक्रमाने घशात अडकले आहेत. सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मागच्या दाराने खासदार शेवाळे, सेलिब्रिटी निर्माती एकता कपूर यांसारख्या व्हीआयपींना प्रवेश देणारे न्यासाचे अध्यक्ष भावोजी बांदेकर हा प्रकार शिवसेनापक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या ‘आदेशा’ने करतात का, याचीही चौकशी व्हायला हवी. आता काही लाडक्या भावोजींचे खरे नाही, असे फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.