सरसंघचालक मोहन भागवत यांची माजी सरन्यायाधीश शरद बोबडेंनी घेतली भेट


नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपुरात भेट घेतली. याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचे आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर, संध्याकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान महल परिसरातील आरएसएस मुख्यालयात बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. तासभर नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच मोहन भागवत किंवा माजी सरन्यायाधीश बोबडे या दोघांकडूनही या बैठकीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

संघ मुख्यालयात संघप्रमुखांची बोबडे यांनी औपचारिकपणे भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय आरएसएसचे संस्थापक केबी हेडगेवार यांच्या जुन्या घरालाही त्यांनी भेट दिल्याची माहिती मिळत आहे. बोबडे यांनी भेट दिलेल्या घरात हेडगेवार यांचा जन्म झाला होता. शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने असलेल्या या घराची काळजी कशाप्रकारे घेतली जात आहे, याबद्दल बोबडे यांनी जाणून घेतले, अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.