तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे – सतेज पाटील


कोल्हापूर : येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे समजते. त्या दृष्टीने आत्तापासून आरोग्य विभागाने ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करावे असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी पालकमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, आरोग्य विभागाने दुसऱ्या लाटेचे अचुक विश्लेषण करावे. जेणेकरुन तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी याचा उपयोग होवू शकेल. हॉस्पिटलचे बेड मॅनेटमेंट (खाट व्यवस्थापन) जिल्हा प्रशासनाने स्वत:च्या ताब्यात ठेवावे. कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी पूर्णत्वाकडे जात असल्याने ऑक्सीजनबाबत कोल्हापूर जिल्हा लवकरच स्वंयपूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करुन चंदगड आणि गारगोटीला ऑक्सीजन प्लॅन्ट तयार करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाबाबत आपण स्वत: आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांशी बोलणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलाचा (खासगी रुग्णालय) सपोर्ट घ्या. 7 ऑक्टोबरपूर्वी आरोग्य विभागाने याची संपूर्ण तयारी करावी तसेच व्हॅक्सीनेशनबाबत काही अडचण येत असल्यास जिल्हा प्रशासनाला कळविण्यात यावे. इन्फ्रास्टक्यरसह आरोग्य विभागाने प्लॅनिंग करावे. तसेच खासगी रुग्णालयाला DCH, CCC मध्ये कनव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या बैठकीत दिल्या.

तत्पूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागाने केलेल्या कामाबाबत तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची पूर्व तयारी याबाबत माहिती दिली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी पालकमंत्र्यांनी विस्तृत संवाद साधून त्यांच्या मागण्या व अडचणीबाबत विचारणा केली.