अमरावती : आरोग्य हिच खरी संपत्ती आहे. त्यामुळे नागरिकांनी निरोगी आयुष्याला प्राधान्य द्यावे. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या आरोग्य शिबिरात तपासणी करून आरोग्यविषयक समस्या सोडवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
नागरिकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा – यशोमती ठाकूर
आशियाई विकास बँक अर्थसहाय्य योजनेतील नेरपिंगळाई येथील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले. यावेळी नेरपिंगळाईच्या सरपंच सविता खोडस्कर, उपसरपंच मंगेश अडणे, मोर्शीचे तहसिलदार सिद्धार्थ मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुषमा शेंदरे, दर्यापूर विशेष प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, सहायक अभियंता प्रशांत सोळंके उपस्थित होते.
तिवसा येथील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन
तिवसा येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीमती ठाकूर यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तहसिलदार वैभव फरतारे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, कार्यकारी अभियंता विकास गिरी उपस्थित होते.
नेरपिंगळाई आणि तिवसा येथील आरोग्य तपासणी शिबिरात सर्वसामान्य तपासणी, महिलांचे आजार आणि कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. नागरिक तपासणी शिबिरात तपासणी करून पुढील योग्य उपचार घेऊ शकतील.
डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर
डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून गतीने तपासणी करून रुग्णांना चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यूच्या चाचणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, मनपा विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद भिसे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. मुक्ता देशमुख, तंत्रज्ञ अभिलाषा ठाकरे, डॉ. अर्चना निकम, डॉ. रंजना खोरगडे उपस्थित होते.
प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणे आणि चाचणीसाठी लागणाऱ्या किटची माहिती श्रीमती ठाकूर यांनी जाणून घेतली. सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली असून अद्ययावत उपकरणांनी सज्ज आहे. तंत्रज्ञाच्या मदतीने चाचणी अहवाल तात्काळ देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.