शिवसेनेला राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही, पण हिंदूंचे सण साजरे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का?; मनसेचा सवाल


ठाणे – उद्या असलेल्या गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने परवानगी नाकारल्यामुळे ठाण्यातील मोठय़ा विशेषत: शिवसेनेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंड्या यंदा रद्द करण्यात आल्या आहेत. पण, हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका मनसेने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनाला बसले आहेत.

मनसेकडून दहीहंडीचे दरवर्षी भगवती शाळेजवळच्या मैदानामध्ये आयोजन केले जाते. यंदाही राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्यामुळे मनसेने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतला आगे. राजकारण करताना शिवसेनेला कोरोना आडवा येत नाही, पण हिंदूंचे सण साजरे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का असा प्रश्न जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

शेकडो शिवसैनिक जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर जमले ते चालते. मुख्यमंत्र्यांचा भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो, ते चालते. कुडाळमध्ये काल नारायण राणे पोहचले, तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोक होते ते चालते. पण हिंदूंचे सण म्हटल्यावर कोरोनाचे कारण दिले जाते. याचे राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही. असा कोणता कोरोना आहे, जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही, पण हिंदू सणांमुळे पसरतो?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांमार्फत आयोजित केले जाणारे दहीहंडी उत्सव राज्य सरकारच्या निर्णयानंतर रद्द करण्यात आले. पण, मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याचा दावा केला आहे. तसेच पोलीस त्यांचे काम करत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेत असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. पण त्याचवेळी दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात आपण ठाम असल्याचे ते म्हणाले आहेत.

एका वेळी या मैदानात पाच हजार लोक जमतात. येथे जर तुम्ही ५० लोकांनाही जमा होण्यास बंदी घालत असाल, तर हे चुकीचे असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करत दहीहंडी उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिल्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात आयोजक विरुद्ध पोलीस असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत.