मॉर्डनाच्या कोरोना प्रतिबंधक लसीत आढळला दूषित पदार्थ


टोकियो – जपानमधील कोरोना लसीकरण मोहिमे दरम्यान एक मोठे संकट निर्माण झाले असून मॉडर्ना कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीत एक दूषित पदार्थ आढळून आल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे जपानमधील लसीकरण मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. मॉडर्ना लसीत जवळपास १५ दिवसांपूर्वी दूषित पदार्थ आढळल्याची पहिली घटना समोर आली होती. त्यानंतर मॉर्डन लसीचा स्टॉक न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यासंदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मॉडर्ना लसीमध्ये रविवारी देखील दूषित पदार्थ आढळून आल्याची तक्रार समोर आली आहे. या वृत्तानंतर जपानमध्ये आतापर्यंत जवळपास १० लाख अतिरिक्त लसींचा वापर करणे बंद करण्यात आले आहे.

जपानमध्ये मॉडर्ना लसीमध्ये दूषित पदार्थ आढळण्याचे पहिले प्रकरण १६ ऑगस्ट रोजी समोर आले होते. याबाबत मॉडर्ना लसीचे जपानमधील स्थानिक वितरक टेकेडा फार्मास्युटिकल्सने पुष्टी दिली होती. यानंतर एकूण लसीच्या ३९ कुप्यांमध्ये दूषित पदार्थ आढळून आला होता. ५ लाख ७० हजार डोसेसचा पहिला स्टॉक बाहेर आल्यानंतर याच स्टॉकमध्ये एकूण ३९ कुप्यांमध्ये दूषित पदार्थ आढळून आले होता.

तर जपान सरकारने २६ ऑगस्ट रोजी देशात ८६३ लसीकरण केंद्रांवर पाठविलेल्या एकूण १.६३ मिलियन मॉडर्ना लसीच्या डोसेसचा वापर करण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यानंतरही जपान सरकारसमोरील अडचणी काही थांबताना दिसत नाहीत. अशाच प्रकारची दूषित लस जपानच्या ओकिनावाच्या लसीकरण केंद्रावरही आढळल्याची माहिती समोर आली.

ओकिनावा येथे लसीची कुपी आणि सुई या दोन्हीमध्ये काळ्या रंगाचा दूषित पदार्थ आढळून आला आहे. तर एका सुईत गुलाबी रंगाचा दूषित पदार्थ आढळून आला आहे. त्यामुळे जपानमध्ये वितरीत करण्यात आलेला लसीचा चौथा स्टॉक देखील संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.

अद्याप लसीच्या कुपीत आढळून येणारा दूषित पदार्थ नेमका काय आहे याबाबतची माहिती समोर आलेली नाही. जपानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लसीत आढळलेला दूषित पदार्थ एक धातूचा कण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या दूषित पदार्थाचे परिक्षण केले जात असून लवकरच याबाबतची अधिकृत माहिती समोर येईल असेही सांगण्यात येत आहे.