मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन चंद्रकांत पाटील आक्रमक; भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात


पुणे – राज्यातील मंदिरे कोरोनाच्या निर्बंधामुळे दीर्घकाळापासून बंद आहेत. येत्या आठ दिवसांत ही मंदिरे उघडावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर आज संध्याकाळपर्यंत या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार मंदिरे उघडण्याचे आदेश देईल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आज पुण्यातील कसबा गणपती मंदिरात जाऊन त्यांनी गणपतीचे दर्शनही घेतले.

आता भाजप कार्यकर्ते मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावेळी बोलताना ते म्हणाले, मंदिरे पूर्णपणे बंद ठेवणे चुकीचे आहे. नियम करुन द्या, एकावेळी दहाच जण आत जातील, ते बाहेर आल्याशिवाय पुढचे दहा आत जाणार नाहीत, मास्क, सॅनिटायझर असे नियम करा. पण आता मंदिरे बंद ठेवू नका. मंदिरे फक्त श्रद्धेचा प्रश्न नव्हे तर रोजगाराचा स्रोतही आहेत. मंदिराबाहेर असलेल्या दुकानावर अनेक संसार चालतात. त्यांचे काय?

त्यांनी यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. यावेळी त्यांनी दोन वर्षे वारी बंद असल्याबद्दलही भावना व्यक्त केली आहे. चारचाकी गाडीतून थेट मंदिरात जाऊन पूजा करणाऱ्यांना वारकऱ्यांच्या भावना काय कळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर लोक फार काळ आपल्या भावना दाबून ठेवू शकणार नाहीत. आणखी काही काळानंतर लोक कुलुप तोडून मंदिरात घुसतील, असेही ते म्हणाले.

जैनांचे पर्युषण पर्व आता लवकरच सुरु होईल, मुस्लिमांना नमाज पढायला मस्जिदीत जायचे असते, ख्रिश्चनांना चर्चमध्ये जायचे असते, शिखांना प्रार्थनेसाठी गुरुद्वारेत जायचे असते. या सर्वांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. धार्मिक स्थळे बंद असतील, तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचे का?, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष मतांसाठी देव, धर्म मानत नाहीत, त्यांना खूष करण्यासाठी उद्धव ठाकरे मंदिरे खुली करायला तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.