अनमोल रत्ने आणि त्यांच्याशी निगडित रोचक आख्यायिका


आपल्या संस्कृतीमध्ये अनमोल रत्नांचा वापर करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. रत्नांचा वापर केवळ आभूषणांसाठी नाही, तर पारंपारिक पोशाख, शस्त्रास्त्रे, इतर शोभेच्या वस्तू यांमध्येही केला जात असे. किंबहुना, आताच्या काळामध्ये अनमोल रत्नांचा मनमोकळा वापर हा सर्रास परवडण्याजोगा नसला, तरी प्राचीन काळी राजा महाराजांच्या संग्रही अनमोल रत्नांची रेलचेल असे. यांपैकी अनेक अनमोल रत्नांशी निगडीत रोचक आख्यायिका अस्तित्वात आहेत. या आख्यायिकांच्या बद्दल जाणून घेऊ या.

अनमोल रत्नांमध्ये सर्वात ‘लहरी’ रत्न म्हणून कुठले असेल, तर ते म्हणजे नीलम. नीलम या रत्नाला हिंदू धर्मातच नाही, तर ख्रिश्चन धर्मामध्येही मोठे महत्व आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये, धर्मगुरु नीलम धारण करीत असत. त्यांनी धारण केलेला नीलम हा पावित्र्याचे आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक मानला जात असे. किंबहुना ख्रिश्चन धर्मामध्ये सर्वतोपरी मानल्या जाणाऱ्या ‘टेन कमांडमेंट्स’ मूळ रूपात नीलम रत्नाच्या पटावर लिहिल्या गेल्या असल्याची मान्यता ही रूढ आहे. हिंदू धर्मामध्ये नीलम शनीचे रत्न मानले जाते. धारण केले गेलेले नीलम रत्न लाभल्यास अतिशय फायदा करविणारे, तर न लाभल्यास मोठ्या नुकसानालाही कारणीभूत ठरू शकते. ब्रिटीश संस्कृतीमध्ये नीलम हा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी धारण केला जात असे.

माणिक या रत्नाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या शतकापासून केला जात आल्याचे उल्लेख सापडतात. त्या काळी या रत्नाला ‘रत्ननायक’, म्हणजेच समस्त रत्नांचा प्रमुख म्हणून ओळखले जात असे. देवतांच्या आशीर्वादाने हे रत्न पृथ्वीवर अवतरले असल्याची मान्यता पुराणांमध्ये उल्लेखली असून, त्याच कारणास्तव देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे रत्न देवतांच्या चरणी अर्पण केले जात असे. अस्सल माणिक रत्नाचा उल्लेख ‘ब्राह्मण’ म्हणून केला जात असून, हे रत्न सर्वोत्तम समजले जात असे. हे रत्न धारण करणाऱ्याला कुठल्याही नकारात्मक गोष्टीपासून संरक्षण मिळत असे, तसेच संपन्नता, सुबत्ता मिळवून देणारे हे रत्न मानले जात असे. ‘गार्नेट’ हे रत्न शारीरिक बल व मानसिक धैर्य वाढविणारे म्हणून धारण करण्याची परंपरा होती. या रत्नामध्ये उर्जा इतक्या मोठ्या प्रमाणात होती, की अनेक गार्नेट एकत्र एखाद्या ठिकाणी ठेवले गेल्यास तो कक्ष प्रकाशाने उजळून निघत असे, आणि ही रत्ने पाण्यामध्ये टाकल्यास पाणी उकळू लागत असल्याचे म्हटले जात असे.

पाचू हे रत्न संपन्नतेचे, सुबत्तेचे प्रतीक आहे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून भारतामध्ये या रत्नाचा वापर प्रचलित असल्याचे उल्लेख पहावयास मिळतात. केवळ भारतातच नव्हे, तर बॅबिलोनियन बाजारपेठांमध्येही हे रत्न ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. हिंदू पौराणिक कथांच्या अनुसार वल नामक एका दैत्याचा वध देवतांनी केल्यावर त्याच्या शरीराचे तुकडे सर्वत्र विखुरले. त्याच्या शरीराच्या तुकड्यांपासून अनेक रत्नांची निर्मिती झाल्याची आख्यायिका असून, त्याच्या रक्तापासून माणिके, दातांपासून मोती, तर यकृतातील हिरव्या पित्तरसामुळे पाचू तयार झाले असल्याचे म्हटले जाते ! ओपल या रत्नाचा इतिहास मात्र वादातीत आहे. अरब संस्कृतीमध्ये, वीज कोसळल्याने या रत्नाचे निर्माण झाले असल्याचे म्हटले जात असून, विज चमकताना आकाशामध्ये दृष्टीस पडणारे सर्व रंग या रत्नामध्ये उतरून आले असल्याची मान्यता आहे. ग्रीक संस्कृतीमध्येही या रत्नाला मोठे महत्व होते. या रत्नाला खरी प्रसिद्धी लाभली, ती राणी व्हिक्टोरियामुळे. ओपल हे रत्न तिच्या खास आवडीचे असून तिने अनेक आभूषणे बनवून घेण्यासाठी या रत्नाचा वापर केला. मात्र तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा तिचा पोशाख अचानक खराब झाला, तेव्हा तो या रत्नामुळेच झाला असे समजून तिने हे रत्न वापरणे सोडून दिले.

ओपल रत्नाशी निगडीत आणखी एक रोचक कथा, स्पेनचे राजे आल्फोन्सो (बारावे) यांच्याशी निगडित आहे. राजे आल्फोन्सो सरदार घराण्यातील एका अतिशय सुंदर तरुणीच्या प्रेमात पडले खरे, मात्र शाही खानदानाच्या रीतीला अनुसरून त्यांना विवाह मात्र राजकुमारी मर्सिडिसशी करावा लागला. त्यांच्या विवाहाप्रीत्यर्थ आल्फोन्सोच्या प्रेयसीने एक अतिशय देखणी ओपल रत्नाची अंगठी राजकुमारी मर्सिडिससाठी भेट म्हणून पाठविली. ही अंगठी धारण केल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यामध्ये मर्सिडिसचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर आल्फोन्सोने ही अंगठी आपल्या आजीला, म्हणजेच राणी क्रिस्टीनाला भेट म्हणून दिली. ही अंगठी धारण केल्यानंतर राणी क्रिस्टीनाचा देखील लवकरच मृत्यू झाला. त्यानंतर राजाने ही अंगठी स्वतःच्या बहिणीला आणि तिच्यानंतर स्वतःच्या भावजयीला धारण करण्यास दिली असता, त्यांचा ही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर राजाने ही अंगठी स्वतः धारण केली असता, तोही अकस्मात निधन पावला. अश्या प्रकारे हे रत्न शापित ठरविले गेले खरे, पण काही इतिहासकारांच्या मते, बहुतेक सर्वच व्यक्तींच्या मृत्यूशी ओपल रत्न शापित असण्याचा काही एक संबंध नसून, त्याकाळी स्पेनमध्ये पसरलेल्या कॉलराच्या साथीमुळे बहुतेक व्यक्तींचे मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment