मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांचे संपूर्ण संरक्षण करण्यात आले आहे. दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या देशात महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. काल राज्याने लसीकरणाची विक्रमी कामगिरी नोंदवत दिवसभरात सुमारे १० लाख नागरिकांना लसीकरण करून सार्वजनिक आरोग्य विभागाने अतुलनीय कामगिरी बजावली आहे.
लसीकरण मोहिमेत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या दीड कोटीवर; देशात महाराष्ट्र अग्रेसर
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्राने दोन्ही डोस झालेल्यांची संख्या दीड कोटीवर गेल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते हे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच प्रशंसनीय आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस दिली होती, मात्र हा विक्रम मोडून काढत राज्याने २१ ऑगस्ट रोजी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांचे लसीकरण करून विक्रमी कामगिरी नोंदवली होती. त्यानंतर दि.२७ रोजी ९ लाख ९० हजार इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले आहे.