सामाजिक कार्य म्हणून संस्कृतचा प्रचार करावा – उदय सामंत


नागपूर : महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने सन्मानित सर्व सत्कारमूर्तींनी संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सामाजिक कार्य यापुढेही अविरतपणे सुरु ठेवावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रामटेक येथे केले. उच्च शिक्षण विभाग तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

खासदार डॉ . विकास महात्मे , कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, अभिजित वंजारी यांच्यासह कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, उज्जैनच्या महर्षि पाणिनि संस्कृत व वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजयकुमार, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे, उच्च शिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक प्रकाश बच्छाव, नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. असे सांगत सामंत म्हणाले की, ही भाषा काही लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी, यासाठी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ केवळ रामटेक पुरतेच मर्यादित न राहता त्याची उपकेंद्रे रत्नागिरीसह पुणे, परभणी तसेच जळगाव येथे सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत भाषेची व्यापकता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराची परंपरा यापुढे अखंडितपणे सुरु राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

संस्कृत भाषा केवळ शिकून उपयोग नाही तर ती बोलता यावी व दैनंदिन व्यवहारात तिचा उपयोग व्हावा, यासाठी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर ‘संस्कृत भाषा वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल. तसेच मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. राज्यात ‘मराठी विद्यापीठ’ स्थापन करण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील वर्षीपासून कालिदास महोत्सवात महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रास्ताविकामध्ये वरखेडी यांनी महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराविषयी माहिती दिली. या सोहळ्यामध्ये सन 2015 ते 2020 या कालावधीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी 48 सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र तसेच रोख 25 हजार रुपयांची रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे सहा गट आहेत. त्यामध्ये प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक व इतर, संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक, संस्कृत कार्यकर्ता तसेच अन्य राज्यातील संस्कृत पंडितांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

खासदार तुमाने, डॉ. महात्मे, आमदार वंजारी, जयस्वाल यांनीही यावेळी विचार व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचालन प्रा. पराग जोशी तर महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार समितीच्या सचिव प्रा. कविता होले यांनी आभार मानले .

महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना विविध प्रवर्गांतर्गत जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :
अशोक विष्णू कुलकर्णी, प्रमोदशास्त्री प्रकाशराव कुलकर्णी, पंडित कृष्णशास्त्री जोशी, पंडित श्रीहरी धायगुडे, पंडित राजेश्वर विश्वासशास्त्री देशमुख घोडजकर यांना प्राचीन संस्कृत पंडित या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मनोज बालाजी जोशी, वेदचूडामणी दत्तात्रोय पांडुरंग नवाथे(घनपाठी), विश्वनाथ केशवराव जोशी, पंडित दत्तात्रय महादेव मुखणे, पंडित रविंद्र दत्तात्रय पैठणे, पंडित देशिक नारायण कस्तुरे यांना वेदमूर्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

श्रीमती मंगला सोमनाथ गुडे विश्वेकर, दत्ताराम तुकाराम नन्दापुरे, डॉ. श्रीमती शैलजा रानडे, अरविंद महादेव गोसावी (कवठेकर), श्रीमती दुर्गा अरविंद पारखी, डॉ. माधव गोविंद भुस्कुटे, डॉ. हेमा विलास डोळे, डॉ. विजया विलास जोशी, डॉ. ज्योत्स्ना उपेंद्र खरे, डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे, डॉ. गजानन वामनराव आंभोरे तर डॉ. माधवी दीपक जोशी यांना संस्कृत शिक्षक व इतर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. शारदा रमेश गाडगे, डॉ. छाया रावसाहेब पालकर, डॉ. सरोजा भाटे, डॉ. विजया रामचंद्र जोशी, डॉ. ललिता दीपक नामजोशी, प्रा. डॉ. जयश्री दिलीप साठे, प्रा. डॉ. इन्दू चंद्रशेखर देशपांडे, डॉ. रजनी रामचंद्र जोशी, डॉ.मधुसुदन पेन्ना, डॉ. महेश अशोक देवकर, डॉ. मल्हार अरविंद कुळकर्णी, डॉ. कल्पना आठल्ये यांना संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

श्रीमती प्रभा श्रीकृष्ण घुले, डॉ. हंसश्री सतीश मराठे, डॉ. माधव गजानन केळकर, संजीव गोविंद लाभे, डॉ. अजय रामचंद्र निलंगेकर तर तरंगिणी नरेंद्र खोत यांना संस्कृत कार्यकर्ता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रा. डॉ. सिद्धार्थ यशवंत वाकणकर, डॉ. श्रीकिशोर मिश्र, गजानन लक्ष्मीनारायण भट्ट, डॉ. हर्षदेव माधव, प्रा. पुष्पा दीक्षित, आनंदतीर्थ व्ही. नागासंपिगे यांना अन्य राज्यातील संस्कृत पंडित या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर कै. वेंकटरमण रामचंद्र दीक्षित शास्त्री यांना प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला.