वयाच्या पंधराव्या वर्षीपासून एलिझाबेथ लिहितात खासगी रोजनिशी


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी वयाची ९२ वर्षे पूर्ण केली असली, तरी आजही त्या तितक्याच उत्साहाने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. राणी एलिझाबेथने लहानपणी, पंधराव्या वर्षी आत्मसात केलेली एक सवय इतकी वर्ष झाली तरी आजतागायत टिकवून ठेवली आहे. राणी एलिझाबेथ वरकरणी जरी कोणत्याही बाबतीत आपले मतप्रदर्शन जाहीर रित्या करीत नसल्या, तरी त्यांच्या मनातील विचार, एखाद्या गोष्टीबद्दलची, घटनेविषयीची आणि एखाद्या व्यक्तीबद्दलची मते त्या आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवीत असतात. राणी एलिझाबेथची ही रोजनिशी अत्यंत खासगी स्वरूपाची असून ती पाहण्याची परवानगी राणी एलिझाबेथ खेरीज व त्यांचे पती प्रिन्स फिलीप यांच्याखेरीज इतर कोणालाही नाही. राणी एलिझाबेथ यांच्या शाही खजिन्यासाठी केली जाते तशीच सुरक्षेची तजवीज या रोजनिशीसाठी देखील केली जात आली आहे.

राणी एलिझाबेथ दररोज रात्री न चुकता आपल्या रोजनिशीमध्ये घडलेल्या घटनांचे, त्यांनी भेट घेतलेल्या व्यक्तींचे आणि इतर तत्सम उल्लेख करीत असतात. त्या आज ही रोजनिशी शाईच्या पेनने लिहित असून, रोजनिशी खालच्या ‘ब्लॉटिंग पॅड’ वरील ‘ब्लॉटिंग पेपर’ दररोज न चुकता नष्ट करणे हे राणीच्या खासगी सेवकाचे पहिले काम असते. राणीच्या अक्षराच्या खुणा या पेपरवर उमटत असून, त्यावरून राणीने रोजनिशीमध्ये नेमके काय लिहिले असावे, हे कोणाला कळू नये म्हणून हा ब्लॉटिंग पेपर नष्ट करण्याची कामगिरी राणीचा खासगी सेवक दररोज, न चुकता बजावीत असतो. दिवसभराचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर दररोज रात्री राणी एलिझाबेथ आपली रोजनिशी लिहावयास बसलेल्या असताना त्यांच्या खासगी कक्षात प्रवेश करण्याची अनुमती कोणालाही नसते.

राणी एलिझाबेथ यांची ही रोजनिशी त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची असून त्या कुठे प्रवास जरी करीत असल्या, तरी एका काळ्या रंगाच्या लहानशा सुटकेसमधून ही रोजनिशी देखील राणीसोबतच प्रवास करीत असते. या सुटकेसच्या दोनच किल्ल्या असून, त्यातील एक किल्ली खुद्द राणीकडे, तर दुसरी किल्ली राणीच्या खासगी सचिवांकडे असते. राणी एलिझाबेथच्या आजवरच्या रोजनिशी शाही खजिन्याइतक्याच सांभाळून ठेवण्यात येत असतात. किंबहुना एखाद्याच्या हातून या रोजनिशी हरविल्याच तर कदाचित त्याला देहदंडाची शिक्षा देखील देण्यात येईल, इतक्या त्या सर्व रोजनिशी अमूल्य आहेत. राणी एलिझाबेथ यांना रोजनिशी लिहिण्याची सवय आहेच, पण त्यांच्याखेरीज राजे पंचम जॉर्ज यांच्याही रोजनिशी राणी एलिझाबेथ यांच्या संग्रही आहेत. राणी व्हिक्टोरिया आणि राणी एलिझाबेथचे पिता राजे सहावे जॉर्ज यांनाही रोजनिशी लिहिण्याची सवय होती.

राणी एलिझाबेथ आपली रोजनिशी काळ्या शाईमध्ये लिहित असून, मुलायम चामड्याने ‘बाईंड’ केल्या गेलेल्या डायरींमध्ये राणी एलिझाबेथ रोजनिशी लिहितात. आजवर राणी एलिझाबेथ लिहित आलेल्या प्रत्येक रोजनिशीवर राणीचा मोनोग्राम अंकित असून, त्यावर विशिष्ट रोमन नंबर्स लिहिलेले असतात. राणीच्या कोणत्याही रोजनिशीवर तारखा, महिने, वर्ष यांचे उल्लेख नाहीत. केवळ त्या रोजनिशीवरील रोमन नंबर पाहून ही रोजनिशी कोणत्या वर्षातील आहे हे राणी एलिझाबेथना लगेच लक्षात येत असते. दररोजचे दिवसभराचे कार्यक्रम आटोपल्यानंतर कितीही उशीर झाला असला, किंवा कितीही थकवा आला असला, किंवा प्रवासात असतानाही रोजनिशी लिहिण्याचा नेम राणी एलिझाबेथ यांनी आजतागायत कधीच चुकविलेला नाही.

Leave a Comment