कथा मुंबईच्या ‘दबंग’ महिला रिक्षा चालकाची


‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झालेल्या मुंबईतील एका महिला रिक्षाचालकाच्या आयुष्यावर आधारित पोस्ट खूप लोकप्रिय झाली असून, या महिलेची आयुष्यगाथा काहीशी मन हेलावून टाकणारी, अस्वस्थ करणारी आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेली ही पोस्ट शिरीन नामक मुंबईतील एका महिला रिक्षाचालकाची कहाणी कथन करते. आई आणि बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, असमाधानी वैवाहिक जीवन आणि इतरही अनेक अडचणींवर मात करीत शिरीनने स्वतःच्या पायांवर उभे रहात आपले आयुष्य पुन्हा सावरले. तिच्या जिद्दीची, मेहनतीची आणि काहीतरी करून दाखविण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

अतिशय कर्मठ मुस्लिम परिवारामध्ये शिरीनचा जन्म झाला. ती अवघी अकरा वर्षांची असतानाच तिचे आईवडील विभक्त झाले. त्यानंतर शिरीनच्या आईने पुनर्विवाह केला खरा, पण त्यापायी तिला आसपासच्या लोकांची कठोर अवहेलना सोसावी लागली. लोक करीत असलेली सततची निंदा नालस्ती, अपमान शिरीनच्या आईला सहन होईनासे झाले आणि त्यापायी तिने जीव दिला. आई गेल्याचे दुःख अपुरे होते म्हणून ही काय, आईच्या पाठोपाठ काही दिवसातच शिरीनच्या बहिणीचेही निधन झाले. एव्हाना शिरीनच्या वैवाहिक जीवनामध्येही वाद सुरु झाले होते. हे वाद पराकोटीला पोहोचले आणि शिरीनला तिसरे मूल झाल्यानंतर तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला. घटस्फोट झाल्यानंतर शिरीन आणि मुलांची जबाबदारी घेण्यास पतीने साफ नकार दिल्यानंतर मुलांसह घराबाहेर पडण्यावाचून इतर कोणताही पर्याय शिरीनसमोर नव्हता.

आपल्या आणि मुलांच्या पोटापाण्याची काहीतरी सोय पाहणे शिरीनला भागच होते. त्यामुळे शिरीनने रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. तिचा आणि मुलांचा खर्च भागेल इतकी कमाई शिरीन करीत असे, पण ती केवळ एक महिला आहे म्हणून तिचा अपमान करणारे, तिचा गैरफायदा घेऊ पाहणारे, तिला मुद्दाम घालून पाडून बोलणारे लोकही तिच्या आसपास होतेच. पण तरीही हिम्मत न हरता शिरीनने आपला व्यवसाय मोठ्या जिद्दीने सुरु ठेवला. आता शिरीनच्या रिक्षामध्ये नित्यनेमाने प्रवास करणारी मंडळी तिला ‘दबंग’, म्हणजेच कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये घाबरून न जाता कणखरपणे उभी राहणारी, म्हणून ओळखतात. या नव्या संबोधनाचा शिरीनला मनापासून अभिमान आहे, आणि तिच्याप्रमाणे प्रत्येक महिलेनेच ‘दबंग’ असायला हवे असे तिला वाटते.

Leave a Comment