शास्त्रज्ञांनी संशोधनावर भर देण्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे आवाहन


शिर्डी :- महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ देशातील नामांकित आणि प्रतिष्ठीत कृषी विद्यापीठ आहे. कृषी क्षेत्रात संशोधनाला मोठी संधी आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधनावर भर देऊन शेतकऱ्यांना फायदा मिळवून द्यावा असे आवाहन कृषी, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.

राहूरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठात विद्यापीठातील शास्त्रज्ञांची सुसंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती होती त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्योग, खनिकर्म आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, उर्जा व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री विश्वजित कदम म्हणाले, पाण्याचा शास्त्रोक्त वापर करुन शेतीमधून जास्त कृषी उत्पादन घेण्याबरोबरच विद्यापीठाने जागतिक दर्जाच्या पिकांच्या वाणाची निर्मिती केली आहे ही अभिमानाची बाब आहे. येथे तयार करण्यात आलेल्या वाणांना आणि अन्य संशोधनाचा विद्यापीठाने प्रभावी प्रचार आणि प्रसार करावा अशी सूचना त्यांनी केली. जागतिक हवामान बदल तसेच नैसर्गिक संकटाशी मुकाबला करण्यासाठी विद्यापीठाने योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कृषी विभाग आणि विद्यापीठाने समन्वयाने कार्य करण्याची सूचना त्यांनी केली. राज्य शासन, केंद्र शासनाबरोबरच येथील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचा विद्यापीठाच्या यशात मोलाचा वाटा असल्याचे सांगून येणाऱ्या काळात विद्यापीठ सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी प्रास्ताविकात कृषी विद्यापीठाने स्थापनेपासून केलेल्या कार्याची, संशोधनाची आणि मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिली. देशपातळीवरील जवळपास 44 प्रकल्पांवर विद्यापीठात संशोधन चालू असल्याचे सांगून आतापर्यंत 263 पिकांचे वाण तयार केले असल्याची माहिती दिली. या बैठकीला कुलसचिव प्रमोद दहाटे, विद्यापीठाचे सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

नैसर्गिक संकटाशी सामना करण्यासाठी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस मदत म्हणून दिले आहे. मदतीप्रित्यर्थ मुख्यमंत्री सहायता निधीस 39 लाख 88 हजार 82 रुपयांचा धनादेश कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम याच्याकडे आज सुपूर्द केला.

कृषी राज्यमंत्री यांची विविध प्रक्षेत्रास भेट
महात्‍मा फुले कृषी विद्यापीठात बैठकीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी फळ पिक प्रात्यक्षिक, स्वयंचलित वायरलेस ठिबक सिंचन प्रणाली प्रकल्प, औषधी व सुगंधी वनस्पती उद्यान, अखिल भारतीय समन्वित फळे संशोधन केंद्र आणि उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रास प्रत्यक्ष जाऊन भेट दिली आणि तेथील व्यवस्थेची पाहणी केली. संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, उद्यानविद्यावेत्ता डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रक्षेत्रावर केलेल्या कार्याची माहिती मंत्रीमहोदयांना दिली.