ज्योतिष शास्त्राच्या अनुसार हातांच्या बोटांमध्ये या अंगठ्या धारण करणे शुभफलदायी


हिंदूधर्मामध्ये ज्योतिष शास्त्राला मोठे महत्व दिले गेले आहे. नव्या घरामध्ये प्रवेश करण्यापासून ते नवजात अर्भकाचे नामकरण करण्यापर्यंत, विवाह, किंवा नव्या कामाची, व्यवसायाची सुरुवात, प्रत्येक बाबतीत ज्योतिष शास्त्राचा सल्ला घेतला, मानला जात असतो. ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या ग्रहदशेचा प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा पडत असेल याचा अंदाज वर्तविता येत असून, जर जीवनामध्ये काही अडचणी असतील, तर त्या दूर कश्या केल्या जाव्यात याचे अनेक विकल्प देखील ज्योतिष शास्त्रामध्ये सुचविण्यात आले आहेत. कधी काही विशिष्ट पूजा अर्चा, तर कधी दानधर्म, तर कधी हाताच्या बोटांमध्ये विशिष्ट अंगठी परिधान केल्याने भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करता येत असल्याचे जोतिष शास्त्र म्हणते. ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या अंगठ्या शुभफलदायी मानण्यात आल्या आहेत.

ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते अश्या व्यक्तींसाठी जोतिष शास्त्राने कासवाच्या आकाराची अंगठी धारण करण्याचा सल्ला दिला आहे. ही अंगठी धारण केल्याने आत्मवविश्वास वाढतो व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होऊन धनलाभ होतो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये सर्प दोष, पितृ दोष, किंवा ग्रहण दोष असतो, त्यांना सर्पाच्या आकाराची अंगठी धारण करण्याचा सल्ला दिला जातो. उत्तम स्वास्थ्य आणि पारिवारिक सौख्यासाठीदेखील ही अंगठी धारण करण्याचा सल्ला दिला जातो. या अंगठ्या वेगवेगळ्या धातूंमध्ये बनविल्या जात असून, बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात.

तांबे हा धातू आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे हे आपण सर्व जाणतोच. या धातूचा शरीराला होणारा स्पर्शही अतिशय लाभदायी समजला जातो. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार तांब्याने बनविलेली अंगठी धारण केल्यास पत्रिकेमध्ये असलेला सूर्य दोष नाहीसा होतो. तसेच या अंगठीच्या प्रभावाने आत्मविश्वास वाढत असून, समाजामध्ये मानमरातब प्राप्त होतो. आरोग्याच्या सतत बारीक सारीक कुरबुरी सुरु असल्यासही ही अंगठी धारण करण्याचा सल्ला दिला जातो. सुखी आणि संपन्न जीवनासाठी नवरत्नांची अंगठी धारण करणे उत्तम असल्याचे ज्योतिषशास्त्र म्हणते. तसेच ज्यांची मनस्थिती सदैव नैराश्यपूर्ण असते, त्यांनाही नवरत्नांची अंगठी धारण करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी वक्री आहे, त्यांना घोड्याच्या नालेपासून तयार करण्यात आलेली अंगठी धारण केल्याने लाभ होतो. ज्यांना साडेसाती सुरु आहे त्यांना विशेषकरून ही अंगठी धरण करण्यास सांगितले जाते.

Leave a Comment