एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल


मुंबई – एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल सुरु झाले असून याबाबतची माहिती शुक्रवारी (27 ऑगस्ट) सायंकाळी एमपीएससीकडून देण्यात आली. ट्विटर हँडलची घोषणा एमपीएसीकडून होताच त्याला जोरदार प्रतिसादही पाहायला मिळाला. आज दिवसभरात एमपीएससीच्या ट्विटर अकाऊंटचे 6,558 फॉलोअर्स झाले होते. एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हे ट्विटर हँडल महत्त्वाचे मार्गदर्शन आणि मदत करणारे ठरण्यार असल्याचा विश्वास एमपीएससीने व्यक्त केला आहे.

याबाबत एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाचे निर्णय, त्याबाबतची पत्रकं, परिक्षांच्या तारखा, वेळापत्रक यांसह इतरही विविध गोष्टींची माहिती या ट्विटर हँडलवरुन दिली जाणार आहे. त्यामुळे एमपीएससीच्या माहितीबाबत विद्यार्थ्यांना आता इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना आपल्या मोबाईलच्या एका क्लिकवर आवश्यक माहिती मिळू शकेल.


दरम्यान, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा वर्तुळातून एमपीएससीचे ट्विटर हँडल सुरु झाल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण, ट्विटरचा रिप्लाय ऑप्शन एमपीएससीने बंद ठेवला असल्यामुळे एमपीएससी पहिल्याच दिवशी टिकेचे धनी ठरले आहे. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या प्रश्नांच्या सरबत्तीला टाळण्यासाठीच एमपीएससीने ट्विटरवर रिप्लाय ऑप्शन बंद ठेवल्याची चर्चा आहे. कोरोना काळात रखडलेल्या परीक्षा आणि नियुक्त्या यावरुन आगोदरच विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे ट्विटर हँडलवरुन एमपीएससी पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहे.