नवाब मलिकांनी केंद्राला कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीवरुन सुनावले


मुंबई – भारताने एका दिवसात लसीचे सर्वाधिक म्हणजेच १ कोटी डोस देत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा नवा उच्चांक गाठला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे. दरदिवशी देशात एक कोटी लस उपलब्ध झाली पाहिजे, तर महाराष्ट्रात दरदिवशी २०-२५ लाख लोक लसीच्या दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षेत असल्यामुळे देशात एका दिवसात एक कोटीचा लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नसल्याचे म्हणत नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

एक कोटी लसीचा टप्पा देशात एका दिवसात पूर्ण करण्यात आला, तसेच महाराष्ट्रात एका दिवसात ११ लाख लोकांना लस देण्यात आल्यामुळे दुसऱ्या डोसच्या लसीचा साठा राज्य सरकारला गरजेचा असल्याचेही नवाब मलिक यांनी यावेळी नमूद केले आहे. त्याचबरोबर केरळ व महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन राज्यांमध्ये जास्तीत जास्त लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.

केंद्र सरकारचे डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय आहे. याकरिता देशात दररोज एक कोटी डोस देणे आवश्यक आहे. हे लक्ष्य गाठण्यात शुक्रवारी (२७ ऑगस्ट) केंद्र सरकारला यश आले आहे. देशात एकूण ६२ कोटी १२ लाख ११ हजार ७१३ डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ कोटी लोकांना पहिला तर १४ कोटी लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.