विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जर तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक


मुंबई – एकीकडे राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार? याची वाट राज्यभरातल पालक पाहत आहेत. चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांनी याबाबत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळेत जर तयारी पूर्ण झाली, तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. जरी ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरू होत असले, तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचे डॉ. दलवाई यांनी स्पष्ट केले आहे.

दलवाई यांनी यावेळी सांगितले, की जरी मुलांना कोरोनाची लागण झाली, तरी ती सौम्य स्वरुपाची असते. पण, प्रौढांना होणारा संसर्ग गंभीर असल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपूर्ण व्हायला हवे. तसेच शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळून शाळा सुरु करण्यात याव्यात.

पुढे ते म्हणतात, लहान मुलांच्या लसीकरणाचा आणि शाळा सुरु करण्याचा काही संबंध नाही. पण सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे. मुलांना लसीकरण कितपत उपलब्ध असेल, किती जण घेतील याचा आणि शाळा सुरु करण्याचा काही संबंध नाही. पण लसीकरण करणे खूप गरजेचे आहे, पण लांबचा विचार करता. शाळा सुरु करायच्या असतील, तर मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हेच नियम पाळावे लागतील. त्याचबरोबर त्यांनी शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याचेही सांगितले. पण सर्वात जास्त महत्त्वाची विद्यार्थ्यांची सुरक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.