सकारात्मक मानसिकता ठेऊन बँकांनी युवकांची कर्ज प्रकरणे मार्गी लावावीत – उदय सामंत


सिंधुदुर्गनगरी – महामंडळांच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करताना बँकांनी सकारात्मक मानसिकता ठेऊन ती मार्गी लावावीत. कोणत्याही तक्रारी येणार नाहीत अशा पद्धतीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

महामंडळांच्या योजना, मंजूर आणि प्रलंबित कर्ज प्रकरणे याबाबतचा आढावा पालकमंत्र्यांनी आज घेतला. या आढावा बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक पी.के. प्रामाणिक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी.के. गावडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आनंद कर्णिक, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सिद्देश पवार यांच्यासह विविध बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, बँकांचे प्रतिनिधी, महामंडळाचे अधिकारी यांनी एकत्रित बसून आलेल्या कर्ज प्रकरणांबाबत सविस्तर आढावा घ्यावा. प्रत्येक अर्जावर निर्णय घेऊन त्याबाबत लाभार्थ्यांना कळवावे. प्रकरण होणार असेल तर तात्काळ मंजूर करावे. होणार नसेल, काही त्रृटी असतील तर त्याची पुर्तता करून घ्यावी, होणारच नसेल तर का होणार नाही याची कारणे कळवावीत. बेरजोगार युवकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन त्याला स्वबळावर उभे करण्यासाठी बँकांनी सकारात्मक मानसिकतेतून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. बँकांविषयी येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण हे कसे कमी होईल याकडेही बँकांनी जरूर पहावे. राज्यामध्ये जिल्हा अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.