आपल्या वक्तव्याचा गैरवापर करणाऱ्यांना नीरज चोप्राने चांगलेच सुनावले


नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवलेला नीरज चोप्राने नुकताच आपला एक व्हिडिओ ट्विट केला असून त्याने या व्हिडिओमध्ये आपल्या वक्तव्याचा गैरवापर करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. तुमच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी माझ्या वक्तव्यांना वापरु नका, असे त्याने सुनावले आहे. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या घाणेरड्या अजेंड्याचा प्रसार करण्यासाठी माझ्या वक्तव्यांचा वापर करु नये. खेळ आपल्या सर्वांना एकत्र राहायला शिकवतो. कमेंट्स करण्याआधी खेळाचे नियम समजून घ्या.


त्याने या ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्याने या व्हिडिओमध्ये देशवासीयांचे आभार मानले आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये पुढे तो म्हणतो, एका मुलाखतीत मी मागे सांगितले होते, की मी खेळाच्या वेळी भाला फेकण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू नदीमकडून भाला घेतला. पण त्याला फार मोठा मुद्दा बनवण्यात आले. खरंतर ही खूप साधी गोष्ट आहे. सर्व खेळाडू आपल्या व्यक्तिगत भाल्याचा वापर करु शकतात. तसा नियमच असल्यामुळे त्यात काही मोठी गोष्ट नाही. नदीम तो भाला घेऊन तयारी करत होता आणि माझ्या खेळावेळी मी त्याच्याकडून तो भाला मागितला. यात काहीही वेगळे नाही. पण माझ्या माध्यमातून काही लोक हा खूप मोठा मुद्दा बनवत आहे. त्या सर्वांना माझी विनंती आहे की असे काही करु नका.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीरजने ऑलिम्पिकचा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला होता, फायनल सुरू होण्यापूर्वी मी माझा भाला शोधत होतो. पण तो मला मिळत नव्हता. अचानक मला माझा भाला घेऊन अर्शद नदीम चालताना दिसला. मी त्याला म्हणालो, हा माझा भाला आहे, मला दे. मला आता तो फेकायचा आहे. मग त्याने तो मला परत दिला. तेव्हाच तुमच्या लक्षात आले असेल की मी माझा पहिला थ्रो घाईत केला.