देशभरातील १२ ते १७ वयोगटातील मुलांना मिळणार ऑक्टोबरपासून लस


नवी दिल्ली – देशातील कोरोना लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. कारण, देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आता लवकरच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस देण्यात येणार आहे. या वयोगटातील देशात मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना ही लस दिली जाईल. डीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना केंद्र सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले कि, देशात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत, त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात, असा अंदाज असल्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याच शक्यता नाही. उलट, त्यांच्या पालकांमध्ये १० ते १५ पटीने आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याची शक्यता असून शकते, जे साधारणतः १८ ते ४५ वयोगटातील आहेत. म्हणूनच, आम्ही मुलांना लसीकरण सुरू करण्यापूर्वी या (१८ ते ४५) गटाचे लसीकरण करण्यास प्राध्यान्य देत आहोत.