मुंबईतील एकाच सोसायटीत आढळले १७ कोरोनाबाधित; तसेच डेल्टा प्लसचे पाच रुग्ण


मुबंई – महानगरपालिकेच्या अथक प्रयत्नानंतरही मुंबई शहरातून कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणावा तसा अद्याप कमी झालेला नाही. मुंबईत कोरोनासोबत आता डेल्टा प्लसचेही रुग्ण आढळून येत असल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान मुंबईतील कांदिवली परिसरात एकाच इमारतीत १७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कांदिवली पश्चिम येथील वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री इमारतीमधील १७ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सोसायटीला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच पालिकेला मुंबई उपनगरात पाच डेल्टा प्लस रुग्णही आढळून आले आहेत.

त्यातील १७ पैकी १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सात बाधित अजूनही उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन रुग्णालयात आहेत. कांदिवलीतील रहिवाशांसाठी आणखी एक चिंता म्हणजे महानगरपालिकेला पाच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार पूर्व भागात आणि एक पश्चिम भागात आहे.

याबाबत माहिती देताना आर दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणाल्या, शहरात डेल्टा प्लसची प्रकरणे हळूहळू वाढत आहेत आणि तज्ज्ञांच्या मते आम्ही पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेची अपेक्षा ठेऊ शकतो. कोरोनाला लोकांनी हलक्यात घेऊ नये. सण असेल तर एकत्र जमा होणे टाळायला हवे. आता आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक काम करत आहोत. आम्हाला १७ कोरोनाबाधित आढळल्यानंतर महावीर नगर येथील सोसायटीला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. पाच डेल्टा प्लस रुग्ण देखील आर दक्षिण प्रभागामध्ये आहेत. डेल्टा प्लसची प्रकरणे ज्या इमारतींमध्ये आढळली आहेत त्या सील करण्यात आल्या आहेत. आम्ही त्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवत असल्याचे नांदेडकर म्हणाल्या.

वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री सोसायटीचे सचिव हितेश महात्रे म्हणाले, सोसायटीमध्ये १२५ सदस्य आहेत आणि आम्ही नियमितपणे स्वच्छता करतो आणि सर्व खबरदारी घेतो. सात रुग्णांपैकी दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गेल्या चार दिवसात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. ३५ लोकांच्या आम्ही चाचण्या घेतल्या आणि एकही चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. आमच्याकडे डेल्टा प्लसचा कोणताही रुग्ण नव्हता.