सुटकेनंतर नारायण राणेंचे पहिले ट्विट; सत्यमेव जयते


महाड – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून संगमेश्वर येथून अटक केली होती. महाडमधील न्यायालयात राणे यांना हजर करण्यात आले असता जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर रात्री नारायण राणे यांनी ट्विट केले आहे. नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘सत्यमेव जयते’ असे म्हटले आहे.


दरम्यान राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयीचा राजनिती चित्रपटातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. मनोज वाजपेयी व्हिडीओमध्ये एका सभेला संबोधित करताना, आसमाँ में थूकने वाले को शायद ये पता नहीं है की पलट कर थूक उन्हीं के चेहरे पर गिरेगी, असे म्हणताना दिसतो. तसेच पुढे तो, करारा जवाब मिलेगा, असेही म्हणतो. या व्हिडीओच्या माध्यमातून नितेश राणेंनी मंगळवारी राज्यामध्ये घडलेल्या नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका प्रकरणावरुन विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. नितेश यांनी हा व्हिडीओ रात्री पाऊणच्या सुमारास शेअर केला आहे.