ठाणे जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एकलव्य निवासी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू


मुंबई – शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ठाणे जिल्ह्यात आठ निवासी शाळा कार्यान्वित आहेत. या शाळांच्या इयत्ता ६वी च्या वर्गासाठी, तसेच इयत्ता ७ वी ते ९ वीच्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने ३१ ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ठाणे विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जिल्हा पालघर येथील डहाणू, जव्हार तसेच शहापुर अंतर्गत एकुण आठ एकलव्य निवासी शाळा कार्यान्वित आहेत. या शाळेमध्ये इयत्ता ६ वीच्या वर्गात नियमित प्रवेश २४० मुले व २४० मुली तसेच इयत्ता ७ वीच्या वर्गात मुले ५७ व मुली ५२, इयत्ता ८ वीच्या वर्गात मुले ३३ व मुली ३८ आणि ९ वी च्या वर्गातील मुले ४ अशा रिक्त जागा भरणेकरीता अनुसूचित जमाती / आदिम जमाती / पारधी जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येते, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच निवास, अंथरुण-पांघरुण, भोजन, गणवेष, पाठ्यपुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येते. खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवसाय प्रशिक्षण आणि इतर विशेष पाठ्योत्तर कार्यक्रम यासाठी विशेष लक्ष पुरविण्यात येते.

रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याकरीता https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या लिंकवर आवेदनपत्र ऑनलाईन भरुन त्यासोबत विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टल वरील Student ID माहित असणे आवश्यक असल्याचेही प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी सांगितले आहे.