नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. राणेंची जन आशिर्वाद यात्र रायगड येथील महाडमध्ये पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी, मी असतो तर कानाखाली लगावली असती, असे वक्तव्य केल्याचे पहायला मिळाले.

या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मध्यरात्रीपासून शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, युवासेनेतर्फे नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. राणे समर्थक आणि शिवसैनिक जुहू येथील नारायण राणे यांच्या घराबाहेर आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.


शिवसैनिक नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर संतप्त झाले असून युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक समोर आल्यामुळे जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुंबईत युवासेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर धडक देत आंदोलन सुरु केले आहे.

बंगल्यापर्यंत युवासेनेचे कार्यकर्ते पोहचू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पण बंगल्यापासून जवळच वरुण सरदेसाई यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आमच्या देवावर कुणी हात उगारण्याची भाषा केली, तर कायदा सुवव्यस्थेबाबत युवासैनिक विचार करणार नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई यांनी दिली.

दादरमध्ये नारायण राणेंच्या या वक्तव्या विरोधात मध्यरात्रीच पोस्टरबाजी करण्यात आली होती. दादर टीटी परिसरात स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी पोस्टरबाजी केली होती. पण हे पोस्टर पोलिसांनी अवघ्या एक तासात हटवले आहेत. राणेंविरोधात लावलेले हे पोस्टर जरी काढून टाकले असले तरी या पोस्टर्सचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. या पोस्टरमध्ये राणेंचा क्लोजअप फोटो लावून त्याच्या बाजूला कोंबडी चोर असे लिहिण्यात आले आहे.