अटकेत असलेल्या नारायणे राणेंच्या जीवितास धोका; प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप


रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्याचे पडसाड राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. भाजप नेत्यांनी नारायण राणेंच्या अटकेनंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. कोणतीही कलमे नसताना जाणीवपूर्वक राणेंना अटक केल्याचा आरोप त्यांनी केली आहे.


ही अटक निषेधार्ह असून नारायण राणे हे लोकप्रतिनिधी आहेत. खासदार आहेत. केंद्रात मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री आहे. पोलिसांनी राणे साहेब जेवत असताना धक्काबुक्की केली. त्यांना खेचले. त्यांच्या हातात जेवणाचे ताट होते. मी त्याचा व्हिडिओ काढलेला आहे. राज्य सरकारने जे वर्तन केंद्रातील कॅबिनेट मंत्र्यासोबत केले, ते चुकीचे आहे.


राणे साहेबांना गाडीत बसवले आहे. त्यांना कोणत्या कलमाखाली अटक करण्यात येईल याची देखील कल्पना नाही. एसपी बोलायला तयार नाहीत. दरवाजा बंद करून बसले आहेत. आम्हाला अशी भीती आहे की, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे. राणे साहेबांना सहा वाजेपर्यंत असेच ताटकळत ठेवून न्यायालयासमोर न नेता त्यांना रात्रभर तुरुंगात ठेवून रात्रभर छळवाद करण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो, असे भाजप नेते प्रसाद लाड यांनी सांगितले आहे.