तालिबानी घुसताच कुठे नाहीसे झाले अफगाण हवाईदल आणि विमाने?

तालिबानी संघटनेने अफगाणिस्थानची राजधानी काबुलवर ताबा मिळविताच अफगाणी हवाई दलातील विविध प्रकारची २४२ विमाने व हेलीकॉप्टर गायब झाली आहेत. चार विविध ठिकाणी अफगाणी हवाई दलाचे अड्डे आहेत मात्र तालिबानी घुसले आणि या हवाई अड्ड्यावरील बहुसंख्य विमाने आणि हेलीकॉप्टर दिसेनाशी झाली असे समजते. तालिबान्यांच्या हाती लागलेली विमाने आणि हेलीकॉप्टर भंगार असल्याचेही सांगितले जात आहे.

तालिबान विरोधात अफगाणी हवाई दलाचा वापर केलाच गेला नाही या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच ही बाब समोर आली आहे. २००२ मध्ये नवीन अफगाणी हवाई दल स्थापन केले गेले आणि त्याचे मुख्यालय काबुल मध्ये होते. अफगाणी हवाई दलाकडे विविध प्रकारची विमाने, हेलीकॉप्टर, फायटर, मालवाहतूक करणारी अशी २४२ विमाने आहेत आणि हवाई दलात ७००० कर्मचारी आहेत. आता मात्र येथील कार्यालये पूर्ण रिकामी झाली आहेत. भंगार असलेली केवळ ४० -५० विमानेच येथे राहिली आहेत.

अफगाणिस्थान कडे ब्राझीलकडून घेतलेली ए २९ सुपरटूमानो लाईट फायटर्स, एमआय ८, रशियाची माल आणि सैनिक वाहतूक करणारी १७ विमाने, व्हीएच ६० ब्लॅक हॉक्स ही अमेरिकेची ताकदवान हेलीकॉप्टर्स, नाटो, अमेरिकेने दिलेली २०० हेलीकॉप्टर आणि ४७ विमाने आणि २९ जेट फायटर्स अशी ताकद होती. यातील बरीच विमाने रशियन फौजांनी, अमेरिकन फौजांनी अफगाणिस्थान सोडून जाताना येथेच सोडलेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार उझबेकीस्तान मधील विमानतळावर ४६ अफगाणी विमाने, हेलीकॉप्टर दिसली आहेत तसेच ताकिजीस्थान मध्येही काही विमाने दिसली आहेत. अफगाणिस्थानचे राष्ट्रपती अशरफ गनी कुटुंबासह हेलीकॉप्टर मधूनच पळून गेले असून त्यांनी युएई मध्ये आश्रय घेतला आहे.