ब्रिटनमध्ये कामगार टंचाई, जेल मधील कैदी बनले कामगार 

अनेक देशात करोना मुळे बेकारी वाढल्याची आणि लोकांना रोजगार मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असताना ब्रिटन मध्ये मात्र कामगारांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी तेथे तुरुंगातील कैद्यांकडून अनेक कामे करून घेतली जात असल्याचे समजते. या साठी गरजेनुसार या कैद्यांना दिवसा तुरुंगातून बाहेर सोडले जाते आणि काम संपले की पुन्हा तुरुंगात आणले जाते. कैदी पळून जावू नयेत याची जबाबदारी संबंधित संस्थांवर सोपविली गेली असल्याचे सांगितले जात आहे.

गेले काही आठवडे येथील सुपरमार्केट्स रिकामी आहेत कारण ड्रायव्हर, फ्रूट पिकिंग, कारखाने येथे कर्मचारी संख्या खुपच कमी झाली आहे. करोना आणि ब्रेग्झीट मुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे समजते. कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून एका जेल मधील सर्व कैदी या प्रकारे कामावर नेले जात आहेत. कामाच्या बदली त्यांना मजुरी दिली जात आहे.

ब्रिटन मध्ये सध्या ९० हजार एचजीव्ही ड्रायव्हरची कमतरता असून त्यामुळे माल पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. सप्टेंबर मध्ये येथील शाळा सुरु होणार आहेत आणि अनेक कार्यालये सुरु होणार आहेत त्यावेळी परिस्थिती आणखी अवघड बनेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कामगाराची मागणी इतकी प्रचंड आहे की तुरुंगातील कैदी सोडून सुद्धा ती पूर्ण होऊ शकणार नाही असेही सांगितले जात आहे.