कोरोना योद्ध्यांसोबत सुप्रिया सुळेंनी साजरी केली रक्षाबंधन


पुणे – कोरोना काळात जीव धोक्यात घालत जोखीम पत्करुन काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. यावेळी रुग्णवाहिका चालक, सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर यांना राखी बांधण्यात आली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना गेल्या दीड वर्षात कोविड योद्ध्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. आम्ही लॉकडाऊनच्या काळात घरी थांबलेलो असताना कोरोना योद्धे बाहेर मैदानात होते. आपल्या जीवाची काळजी न करता कोरोना योद्ध्यांनी सातत्याने काम केल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. फूल ना फुलाची पाकळी म्हणून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.

माणुसकी आपण सगळे विसरलो असल्याचे मला वाटत होते. पण गेल्या दीड वर्षात मला माणुसकीचे दर्शन झाले. कोरोनाने नात्यांचे महत्व शिकवल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोलिसांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओचा दाखला देत लोकांनी कोरोना काळात दिलेल्या कारणांबद्दल सांगितले. तसेच त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट फॉलो करा असे आवाहन केले.

अद्यापही कोरोना रुग्ण आढळत असून अनेक राजकीय पक्षांचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहे. त्यावेळी कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे सातत्याने कोरोनाचे नियम पाळा जेणेकरुन तिसरी लाट येणार नाही यासाठी काळजी घेण्यास सांगत आहेत. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे.

राज्यात भाजपकडून जन आशिर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. त्यावेळी गर्दी दिसत आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री आणि संजय राऊत याबाबत सविस्तर बोलले आहेत. त्यामुळे केंद्रातील मंत्र्यांनी जबाबदारीने वागून चांगला आदर्श समोर ठेवण्याची गरज आहे. तसेच कोरोना काळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोरोनाविरोधातील युद्धात गर्दीची ठिकाणे आपण सर्वांनी टाळली पाहिजेत. आपणच नियम बनवतो आणि आपणच पाळली नाहीत तर ते फारसे योग्य होणार नाही.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, आमचे दडपशाहीचे सरकार नसल्यामुळे कोणीही काही बोलावे त्याबद्दल काही हरकत नाही. पण ते बोलले म्हणजे काही सत्य होत नाही. राज ठाकरे यांचे विधान लक्षात घेता भविष्यात मनसे आणि भाजप युती करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, कोणी युती करावी किंवा आघाडी करावी, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून जर त्यांनी केलीच तर माझ्या त्यांना शुभेच्छा असतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर पारनेरच्या तहसीलदारांनी आरोप केले आहेत. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी या प्रकरणी माहिती काढलेली असून मी स्वतः त्यांच्या संपर्कात आहे. ज्यावेळी कोणत्याही महिलेचा विषय येतो, तेव्हा आपण सर्वांनी संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. एखादी क्लिप आली म्हणजे समज-गैरसमज होतात. त्यात त्या महिलेची गोपनीयता जपली पाहिजे. आम्ही त्यात स्वतः जातीने लक्ष घालत असल्यामुळे कोणीही अफवांवर विश्वासू ठेवू नये, एवढेच मी सांगू शकते.