कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी धावणार ‘मोदी’ एक्सप्रेस


मुंबई – कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘मोदी’ एक्सप्रेस धावणार असून याबाबतची घोषणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ही माहिती नितेश राणे यांनी ट्वीट करत दिली आहे. विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असून त्यासाठी आरक्षण करावे लागणार आहे.

मी दरवर्षी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्सप्रेस सोडत असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.


ही ट्रेन १८०० नागरिकांसाठी सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुटणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली असून प्रवासात एक वेळचे जेवणदेखील दिले जाणार आहे. नितेश राणे यांनी बुकिंगसाठी प्रवाशांना मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांचे क्रमांक दिले आहेत. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री व संतोष कानडे यांना २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबदरम्यान फोन करुन जागा आरक्षित करायची आहे.