किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर हातोडा


मुंबई – मुरूडमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडण्याचे काम सध्या सुरू झालेले असून मिलिंद नार्वेकर यांच्यावर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा मुद्दा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उचलून धरला होता.

नार्वेकर यांचा हा बंगला मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. सीआरझेडच्या नियमांचे या बंगल्याच्या बांधकामासाठी उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. नार्वेकरांच्या बंगल्या सोबतच अन्य देखील बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे, ज्याबद्दल तक्रार करण्यात आलेली आहे. आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर पहिला क्रमांक हा नार्वेकरांच्या बंगल्याचा लागल्याचे दिसून आले आहे.


तर, बंगला पाडण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी करून दाखविले !!!! मिलींद नार्वेकरांचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार असल्याचे ट्विट केले आहे. यासोबत त्यांनी नार्वेकरांचा बंगला तोडला जात असल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

दापोली-मुरूड किनाऱ्यावर मिलिंद नार्वेकरांनी अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडे कापली. त्या जागेची किंमत सध्याच्या घडीला १० कोटी आहे, दोन मजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे आणि त्याला मार्गदर्शन बहुतेक पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरेंचे आहे. या बांधकामासाठी कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतलली नाही. अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात व मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवले होते.