जगातील पहिल्या, डीएनए आधारित स्वदेशी ‘झायकोव्ह डी’ करोना लसीला परवानगी

करोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी युद्धस्तरावर जगभर प्रयत्न सुरु असतानाच फार्मा कंपन्याही प्रभावी लस बनविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात स्वदेशी कंपनी झायडस कॅडिलाच्या ‘झायकोव डी’ लसीला भारत सरकारने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे जगातील ही पहिलीच डीएनए आधारित लस आहे. ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाच्या विशेष समितीने शुक्रवारी या लसीची शिफारस केली आहे.

भारतात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन नंतरची ही दुसरी स्वदेशी लस आहे. जगातील ही पहिलीच डीएनए आधारित लस असल्याचे सांगितले जात आहे. याचा फायदा असा की करोना विषाणू जसा रूप बदलेल त्यानुसार या लसीमध्ये बदल करता येतो. झायडस च्या लसीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून समाधान व्यक्त केले असून देशाला करोना विरुद्धच्या लढाईत मोठी मदत होईल असे म्हटले आहे.

देशात सध्या दोन डोसवाल्या करोना लसी दिल्या जात आहेत. झायकोव डी ही तीन डोस लस असून २८-२८ दिवसांच्या अंतराने हे डोस दिले जाणार आहेत. रूम टेम्परेचर ला ही लस साठविता येते. ही सिरिंज फ्री लस आहे. म्हणजे जेट इंजेक्टरच्या सहाय्याने ती दिली जाणार आहे. मोठ्या वयाच्या नागरिकांबरोबर १२ ते १८ वयोगटासाठी सुद्धा ही लस दिली जाईल. कंपनीची महिन्याला २ कोटी डोस उत्पादनाची क्षमता असून या लसीच्या चाचण्या २० हजार लोकांवर केल्या गेल्या आहेत.