राज ठाकरेंचे शरद पवारांच्या खोचक सल्ल्याला प्रतिउत्तर!


मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यातील जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यावर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला होता. प्रबोधनकार ठाकरेंचे विचार राज ठाकरेंनी वाचावेत, असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. आता राज ठाकरेंनी त्या मुद्द्यावरून शरद पवारांना प्रतिउत्तर दिले आहे. तसेच, यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर टीका केल्यामुळे आता जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचण्याचा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना आपल्या आधीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. मी प्रबोधनकार ठाकरेही वाचले आहेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत. जे मी बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता, पवार साहेबांनी हे मला समजावून सांगावे. मी एका चॅनलला मुलाखत दिली. आपण गेल्या ७५ वर्षांमध्ये काय कमावले आणि गमावले याचा उहापोह त्यात होता. त्यांना मी हेच सांगितले की जोपर्यंत आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती, असे राज ठाकरे म्हणाले.

आपल्याकडे हजारो वर्षांपासून जात ही गोष्ट आहे. जर आपण १९९९ साल पाहिले, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष ९९ सालानंतर वाढला. दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. याची माहिती सर्व राजकीय पक्षांना आहे. मी फक्त बोललो. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातील होते. आपल्याला पाहिजे तेवढेच प्रबोधनकार ठाकरेंचे घ्यायचे, बाकीचे घ्यायचे नाही, असे करता येणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार देखील मी वाचले असल्याचे यावेळी राज ठाकरे म्हणाले.