मनसे कार्यकर्त्यांनी फोडला भिवंडीतील टोल नाका


भिवंडी – सध्या भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन दिवसांपासून स्थानिक नागरिकांनी गाव विकास समितीच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मनसे कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरील मालोडी येथील टोल नाका गुरुवारी बंद केला होता. पण, मनसे कार्यकर्त्यांची पाठ फिरताच गुरुवारीच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीने हा टोल नाका पुन्हा सुरु केला होता.

टोल नाका मनसे पदाधिकाऱ्यांनी बंद करूनही हा टोल नाका कंपनीने सुरु केल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी मालोडी येथील टोल नाका लोखंडी रॉडच्या साहाय्याने फोडला आहे. रस्त्याची कामे आधी पूर्ण करा, मगच टोल नाका सुरु करा अशा घोषणा देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.