कसोटी मालिका; इंग्लंडच्या संघात डेविड मलानचे पुनरागमन


नवी दिल्ली – भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात पहिला सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. तर दुसरा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला. इंग्लंडने भारताच्या विजयानंतर तिसऱ्या कसोटीसाठी संघात काही बदल केले आहेत. २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले (लीड्स) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. इंग्लंडने संघातून जॅक क्रॉले, डॉम सिबली, जॅक लीच यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

दुसरीकडे टी-२० मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेविड मलानचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज साकिब महमूदला संघात स्थान मिळाले आहे. साकिबला तिसऱ्या कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. डेविड मलानने ऑगस्ट २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५ कसोटी सामन्यात त्याने २७.८ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या आहेत. त्यात एका शतकाचा समावेश आहे. तर साकिबने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने ९ गडी बाद केले होते. ही मालिका इंग्लंडने ३-०ने जिंकली होती.

दरम्यान दोन कसोटी सामन्यात फलंदाज डॉम सिबली पूर्णपणे निष्फळ ठरला आहे. त्याने १४.२५ च्या सरासरीने फक्त ५७ धावा केल्या होत्या. त्याने लॉर्ड्समध्ये पहिल्या डावात ४४ चेंडूत ११ धावा, तर दुसऱ्या डावात त्याला खातेही खोलता आले नाही. तर एका कसोटीत खेळण्याची संधी जॅक क्रॉलेला मिळाली. त्याने १६.५० च्या सरासरीने ३३ धावा केल्या होत्या. तर फिरकीपटू जॅक लीचला अंतिम अकरा खेळाडूत स्थान मिळाले नव्हते. तसेच अष्टपैलू मोइन अली आणि क्रेग ओव्हरटन या दोघांना इंग्लंडच्या कसोटी संघातून रिलीज करण्यात आले आहे. दोन्ही खेळाडू द हंड्रेड स्पर्धेत आपआपल्या संघाकडून खेळणार आहेत. ओव्हरटन साउदर्न ब्रेव संघाचा सदस्य आहे. शुक्रवारी या संघाला एलिमिनेटर सामना खेळायचा आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, जॉन बेअरस्टोस रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, साकिब महमूद, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, मार्क वूड