अपघातातून थोडक्यात बचावले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील


पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कोथरुड येथील चांदणी चौक येथील कामाची पाहणी केली. पण यावेळी झालेल्या एका अपघातामधून चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले. चांदणी चौक येथील उतारावर पत्रकारांशी संवाद सुरु असतानाच तीव्र उतारावरुन येणाऱ्या एका चालकाची दुचाकी तेथे जमा झालेल्या गर्दीवर आदळली. यावेळी चंद्रकांत पाटीलही तेथे उपस्थित होते.

सुदैवाने आजूबाजूला कार्यकर्ते असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना काही झाले नाही. दुचाकीस्वाराने मद्यपान केल्याच्या शंकेवरुन कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पण चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी कार्यकर्त्यांना थांबवले. थांबा त्याला मारु नका, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना थांबवले आणि त्यांनी दुचाकीस्वाराची चौकशी केली. तुला लागले नाही ना असं चंद्रकांत पाटील यांनी दुचाकीस्वाराला विचारले. चंद्रकांत पाटलांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांनी दुचाकीस्वाराला तेथून जाऊ दिले. हा सर्व प्रकार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.