बीडीडी चाळीतील रहिवाशांना स्टॅम्प ड्युटीसाठी द्यावे लागणार फक्त हजार रुपये


मुंबई – केवळ 36 महिन्यात मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम पूर्ण होईल आणि येथील मूळ रहिवाशांना नव्या घरांची चावी मिळेल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर आता ठाकरे सरकार या चाळीतील रहिवाशांसाठी आणखी एक सुखद बातमी देणार आहे. स्टॅम्प ड्युटीसाठी बीडीडी चाळीतील रहिवाशांना फक्त एक हजार रुपयेच भरावे लागणार असून, याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे. या निर्णयामुळे बीडीडी चाळवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. महाराष्ट्र शासनाचा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता, या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन 1920 ते 1924 या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच, बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.

वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ, नायगाव आणि शिवडी येथे सुमारे 92 एकर जागेवर या योजनेअंतर्गत बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली. या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार वर्ग प्रामुख्याने राहू लागला. 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळींमध्ये तर अनेक साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार अशी अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते. तसेच मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे.

शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत. म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.

वरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहे. रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे.

खिडक्यांसाठी पावडर कोटिंगचे अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक इमारतीमध्ये 3 पॅसेंजर लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट आणि एका फायर लिफ्टची सुविधा असणार आहे. पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ + 6 मजली पोडियम पार्किंग आणि 2 प्रशस्त जिने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व पुनर्वसन इमारती भूकंप रोधक असणार आहेत.