२० वर्षानंतर गुहेबाहेर आला आणि प्रथम घेतली करोना लस

कोलाहलापासून दूर, शांत जीवन जगावे असे अनेकांना वाटते, पण कुटुंबीय, दोस्त, नातेवाईकांना सोडून असे एकांतात जगणे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही. एका व्यक्तीने हे आव्हान नुसते स्वीकारलेच नाही तर गेली २० वर्षे एकट्याने गुहेत काढलीही. मात्र एक दिवस जेव्हा तो शहरात आला तेव्हा त्याला नवीनच शब्द ऐकायला मिळाला,’ करोना’. करोनातला क सुद्धा कधी माहिती नसलेल्या या व्यक्तीला जेव्हा करोनचा उपद्रव समजला तेव्हा त्याने सर्वप्रथम पहिले काम कुठले केले तर करोनाची लस घेतली.

७० वर्षाच्या हा माणूस द. सर्बिया मधल्या स्टार प्लानिना डोंगरात एका गुहेत गेली २० वर्षे राहतो आहे. द. मिररच्या बातमीनुसार पेंटा पेट्रोवीक हा माणूस जगात ‘सोशल डीस्टन्सिंग किंग’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गेली २० वर्षे त्याचा बाहेरच्या समाजाशी काहीही संबंध नाही. आयुष्यात ५० वर्षे करावी लागलेली धडपण, काबाडकष्ट आणि दगदग यामुळे तो त्रस्त झाला होता आणि स्वातंत्र मिळविण्यासाठी पिरोट शहराजवळच्या या डोंगरातील गुहेत येऊन राहिला.

तो जेव्हा शहरात परतला तेव्हा त्याला करोनाने जगभरात जो धुमाकूळ घातला त्याची माहिती मिळाली. तेव्हा सर्वप्रथम त्याने लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली. इतकेच नव्हे तर लसीचे तीन डोस घेणार असेही त्याने सांगितले. पेंटा म्हणतो, लस घेतली नाही तर करोना माझ्या गुहेपर्यंत पोहोचला असता. गुहेत मी मजेत आहे. कुणाशी भांडण नाही, वादावादी नाही, सगळी शांतता. पेंटा नाल्यातील मासे पकडून खातो, भरपूर मश्रुम खातो आणि गवताच्या गादीवर झोपतो. त्याने तरुणपणात जो पैसा मिळविला तो सगळा दान केला आहे. पेंटा म्हणतो,’ पैसा माणसाचा भेजा खराब करतो. माणसाला पैशाशिवाय कुणीच भ्रष्ट करू शकत नाही.’ आता बोला!